राज्याच्या राजकारणात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आलेत तर ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं अभिनंदन केलंय. मात्र उत्तर प्रदेशमधील याच भोंग्याच्या कारवाईसंदर्भात बोलताना अजित पवार यांनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवलीय.

नक्की वाचा >> इंधनावरील कर कमी करण्याच्या मोदींच्या सल्ल्यावर अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, “केंद्र सरकारने देखील पेट्रोल-डिझेलवर कर लावताना…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशात नेमकं घडलंय काय?
उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. मागील चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्याविरोधातील मोहीम सुरु करण्यात आलीय.“राज्यभरामध्ये धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवणे तसेच त्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित करण्याची मोहीम हाती घेण्यात आलीय. याच अंतर्गत एकूण १० हजार ९२३ भोंगे हटवण्यात आलेत. तर ३५ हजार २२१ भोंग्यांच्या आवाजाला मर्यादा घालून देण्यात आलीय,” असं अतिरिक्त निर्देशक सचिव (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी म्हटलंय.

नक्की वाचा >> केंद्र सरकारकडून २६ हजार ५०० कोटींची जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर…; फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट सवाल

योगींच्या निर्देशानंतर कारवाई
मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विषयासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक मान्यतांचं पालन करण्याचा अधिकार आहे. मात्र त्याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे, असं मत व्यक्त केलेलं. “भोंगे वापरण्याला हरकत नाही. मात्र भोंग्यांचा आवाज त्या धार्मिक स्थळांच्या आवातापुरता मर्यादित राहील याची काळजी घ्या. याचा इतर लोकांना काही त्रास होता कामा नये,” असं योगी बैठकीमध्ये म्हणाले होते. यानंतर गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत हिंदू आणि मुस्लीम धर्मीय नेत्यांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजाच्या धार्मिक नेत्यांनी भोंग्यांचा आवाज कमी करण्यावर सहमती दर्शवली.

नक्की वाचा >> अर्थमंत्री अजित पवारांना आज चांगली झोप लागणार नाही; जाहीर भाषणात शरद पवारांचं वक्तव्य; अन् त्यानंतर…

अजित पवारांचा मनसेला टोला
याच संदर्भात आज प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना अजित पवार यांनी मनसेने भोंग्यासंदर्भातील प्रश्नावर विरोधी भूमिका घेतल्याचं सांगितलं. “राज्यात सलोखा राहावा यासाठी राज्यसरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. मनसे सोडून सर्व पक्षांनी एकत्र भूमिका घेतलेली आहे. भाजपने तर बैठकीवर बहिष्कार टाकला होता. सुप्रीम कोर्टाने लाऊडस्पीकरबाबत आधीच नियमावली दिलेली आहे. उद्या जर एखादा निर्णय घ्यायचा असल्यास सर्वांसाठी एकच कायदा करावा लागेल,” असं अजित पवार म्हणाले.

नक्की वाचा >> “१२ वाजता उठणाऱ्याने अजित पवारांवर टीका केली म्हणून…”; राष्ट्रवादीचा राज ठाकरेंना टोला

योगींच्या निर्णयावर अजित पवार म्हणाले…
अजित पवार यांनी उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक स्थळांवरील भोंगे काढले जात असल्यासंदर्भातही भाष्य केलंय. “योगींनी उत्तर प्रदेशमध्ये काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन जाणारा आहे,” अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी या विषयावर बोलताना मांडली.

भाजपाला कोणी थांबले होते?
“इतके वर्ष हे सर्व चालत आलेले आहे. आतापर्यंत भाजपाला (निर्णय घेण्यापासून) कोणी थांबवले होते. आजच ही मागणी का केली जात आहे? उद्या सुप्रीम कोर्टाने काही आदेश काढला तर सर्व धर्माच्या भाविकांना तो निर्णय लागू होईल, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे,” असंही अजित पवार म्हणाले.

नक्की वाचा >> “तुम्ही मला मंत्रीमंडळात घेणार असाल तर…”; शरद पवारांनी जाहीर भाषणात अगदी हात जोडून सांगितला ‘तो’ किस्सा

मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल
“भारतातील महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जातीय दरी निर्माण करुन आज जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरु आहे. नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही, सर्वांनी गांभीर्याने या गोष्टी घेऊन मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल,” असेही अजित पवार यांनी म्हटले.

नक्की वाचा >> “आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरेंनी…”; पवार नास्तिक असल्याच्या वक्तव्याला फोटो शेअर करत राष्ट्रवादीचं उत्तर

राज ठाकरेंकडून कौतुक
राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारवर कौतुकाचा वर्षाव केलाय. मात्र त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. योगी सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावरुन व्यक्त होताना राज यांनी एक पोस्ट केलीय. यामध्ये राज यांनी, “उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार,” असं म्हटलंय. पुढे बोलताना राज यांनी, ठाकरे सरकावर निशाणा साधलाय. “आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!”, असं म्हटलंय. तर पोस्टच्या शेवटच्या ओळीत राज यांनी, “महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना,” असंही म्हटलं आहे.

मंदिरं आणि मशिदींनीही घेता पुढाकार…
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमधील मंदिरांपासून ते अगदी लखनऊमधील शिया मशिदींपर्यंत सर्वांनीच यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचं दिसतंय. मथुरेमधील श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराने रोज पहाटे पाच वाजता भोंग्यावरुन म्हटली जाणारी मंगल चरण आरती भोंग्यावर न वाजवण्याचा निर्णय घेतला. भागवत भवन येते श्री कृष्ण जन्मभूमीच्या आवारामध्ये रोज पहाटे पाच वाजता भोंग्यावरुन एक तास आरती ऐकवली जायची. अशाच प्रकारे अयोध्येसहीत इतर शहरांमधून प्रतिसाद मिळत असून अनेकांनी स्वइच्छेने आवाजावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतलाय.

नक्की वाचा >> राष्ट्रवादी विरुद्ध मनसे वाद चिघळला : शरद पवारांचा चेहरा म्हशीच्या…; मनसेनं आव्हाडांना दिलं उत्तर

लखनऊमधील इदगाहचे इमाम असणाऱ्या मौलाना खलिद रशिद फिरंगी महाली यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सर्व सुन्नी मशिदींना भोंग्यांचे आवाज कमी करण्याचे निर्देश दिल्याचं म्हटलंय. “आम्ही सर्व मशिदींमधील भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले असून आवाज मशिदीबाहेर येणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलंय,” असं इमाम म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar first comment as yogi adityanath government loudspeakers removed from 11000 up religious places scsg