संसदेतून सेंगोल हटवा अशी लेखी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार आर. के. चौधरी यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. सेंगोल हटवून त्या ठिकाणी देशाचं संविधान ठेवा अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. ज्यानंतर भाजपाच्या खासदारांनी टीकेचे बाण चालवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर. के. चौधरी यांनी काय म्हटलं आहे?

“सेंगोल म्हणजे राजदंड, याचा अर्थ राजाच्या हाती असलेला दंड असाही होतो. पण राजेशाही संपून देश स्वतंत्र झाला आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. मग सत्ता राजदंडाप्रमाणे चालणार आहे की संविधानाप्रमाणे? त्यामुळेच माझी मागणी आहे की संसदेतून सेंगोल हटवण्यात यावा आणि त्या ठिकाणी संविधान ठेवण्यात यावं.” मागच्या वर्षी नव्या लोकसभेत सेंगोल ठेवण्यात आला आहे. हा सेंगॉल ब्रिटिशांनी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरुंच्या हाती सोपवला होता. आम्ही आता सत्ता सोडत आहोत तुम्ही ती स्वीकारा हा त्याचा प्रतीकात्मक अर्थ होता. आता हाच सेंगोल हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

अखिलेश यादव यांनी काय म्हटलं आहे?

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सेंगोलच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या खासदाराने ही मागणी केली. याचं कारण संसदेत पहिल्यांदा जेव्हा सेंगोल ठेवण्यात आला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या सेंगोलला नमस्कार केला होता. मात्र यावेळी खासदारकीची शपथ घेताना सेंगोलचा नरेंद्र मोदींना विसर पडला.”

मीसा भारती, रेणुका चौधरींनी या प्रकरणी काय म्हटलंय?

लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांनीही सेंगोल संसदेतून हटवण्याची मागणी केली. “भारत हा लोकशाही मानणारा देश आहे. सेंगोलल आता संग्रहालयात ठेवला पाहिजे म्हणजे तो संग्रहालयाला भेट देणाऱ्या अभ्यासकांना, पर्यटकांना पाहता येईल.” राजदचे खासदार मनोज झा म्हणाले की, “सेंगोल संसदेतून हटवला पाहिजे. राजांची प्रतीकं, मुद्रा कशाला संसदेत हवीत? त्यापेक्षा संविधानच त्या ठिकाणी ठेवलं गेलं पाहिजे.” काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी म्हणाल्या, “भाजपाला कधीही दाक्षिणात्य संस्कृती समजणार नाही. तामिळ संस्कृती म्हणजे फक्त सेंगोल नाही. तर त्या संस्कृतीत सर्वाधिक बुद्धिमान लोक आहेत.”

बिहारचे भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी या प्रकरणी काँग्रेसवर टीका केली आहे. “काँग्रेस सत्तेत येण्यासाठी लोकांची दिशाभूल करत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.” तर योगी आदित्यनाथ यांनीही यावर टीका केली आहे.

समाजवादी पक्षाने तामिळ संस्कृतीचा अपमान केला

आर. के. चौधरी यांनी जे पत्र लिहिलं आणि सेंगोल हटवण्याची मागणी केली त्यानंतर योगी आदित्यनाथ आक्रमक झाले आहेत. “समाजवादी पक्षाने ही मागणी करुन तामिळ संस्कृतीचा अपमान केला आहे. इंडिया आघाडीलाही हा अपमान सहन होतो आहे. कारण संस्कृतीचा अपमान करणं हेच काँग्रेसही करत आलं आहे.” या आशयाची पोस्ट योगी आदित्यनाथ यांनी लिहिली आहे. “सेंगोल हे जर राजसत्तेचं प्रतीक आहे असं सपाचं म्हणणं आहे तर मग पंडीत नेहरुंनी तो सेंगोल ब्रिटिशांकडून कसा काय स्वीकारला? त्यांनी राजेशाहीचं प्रतीक म्हणून तो स्वीकारला का?” असा प्रश्न शेहजाद पूनावाला यांनी उपस्थित केला आहे.

हे पण वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक उल्लेख केलेल्या ऐतिहासिक चोल साम्राज्याचा इतिहास काय?

सेंगोलचा थोडक्यात इतिहास

चोल साम्राज्यात सत्ता एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सोपवताना राजदंडाचा म्हणजेच सेंगोलचा वापर केला जायचा. या सेंगोलकडे प्रतीकात्मकतेने राजवट आणि सत्ता म्हणून पाहिले जायचे. नव्याने राज्याभिषेक झालेल्या राजाला हा सेंगोल देऊन न्याय्य तसेच पारदर्शक पद्धतीने राज्यकारभार करावा, असे सांगितले जाई.

सेंगोल पंडीत नेहरू यांच्याकडे कसा सोपवण्यात आला?

उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार अथिनाम मठातील दुसऱ्या क्रमांकाचे पुजारी, नादस्वरम वादक राजारथिनाम पिल्लाई, तसेच ओदूवर (गायक) अशा तीन व्यक्तींनी तामिळनाडूमधून हा राजदंड आणला. १४ ऑगस्ट १९४७ रोजी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये पुजाऱ्यांनी हा राजदंड लॉर्ड माऊंटबॅटन यांना दिला. त्यानंतर तो त्यांच्याकडून परत घेतला. पुढे मोठी मिरवणूक काढून हा राजदंड पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निवासस्थानी नेण्यात आला. त्यानंतर हा राजदंड नेहरूंकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी तेथील पुजाऱ्यांनी खास गाणे सादर केले होते. तशी उपलब्ध कागदपत्रांमध्ये नोंद आहे

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akhilesh yadav party mp wants constitution to replace sengol bjp hits back scj