पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा आपल्या भाषणात भारतीय संस्कृती व इतिहास यांचा संदर्भ देताना दक्षिण भारतातील ऐतिहासिक चोल साम्राज्याचा अनेक वेळा उल्लेख केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात; या भवनात जो ‘सेंगोल’ राजदंड स्थापन करण्यात आला त्या राजदंडाची संकल्पना चोलकालीन असल्याचे सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर जगाच्या इतिहासात लोकशाहीचा सर्वात प्राचीन संदर्भ भारतात सापडतो हे सांगतानाही, पंतप्रधान मोदी यांनी चोलकालीन उत्तरामेरुर पुराभिलेखाचेच उदाहरण दिले होते. त्यामुळेच खुद्द पंतप्रधानच ज्या ऐतिहासिक राजवंशाच्या प्रेमात आहेत, त्या चोल राजवंशाविषयी जाणून घेणे नक्कीच समयोचित ठरावे.

चोल हे जगाच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ राज्य करणाऱ्या राजवंशांपैकी एक होते. इसवी सनाच्या नवव्या शतकात त्यांनी तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील संपूर्ण क्षेत्र चोला साम्राज्याच्या अधिपत्याखाली आणले होते. दक्षिण भारतातील ते काही मोजक्या राजवंशांपैकी होते ज्यांनी भारताच्या उत्तर व पूर्व दिशेला साम्राज्य विस्तार करण्याचा प्रयत्न केला. या घराण्यातील राजेंद्र चोल याने इसवी सनाच्या १० व्या शतकात बंगालच्या पाल राजवंशाचा पराभव केला होता. इतकेच नव्हे तर भारतीय इतिहासात चोल राजवंशाकडे एक महत्त्वकांक्षी राजघराणे म्हणून पाहिले जाते. या भारतीय राजवंशाने भारताबाहेरही आपला साम्राज्य विस्तार केला. श्रीलंका, मालदीव, चीन, जावा/सुमात्रा आणि आग्नेय आशिया या भागात चोलसाम्राज्याचे व व्यापाराचे आजही पुरावे सापडतात. त्यामुळेच भारतीय इतिहासात चोलांचा कालखंड हा समृद्ध कालखंड म्हणून ओळखला जातो.

Loksatta explained One year of Hamas attack how situation in West Asia changing forever
हमास-इस्रायल संघर्ष वर्षभरातच संभाव्य इस्रायल-इराण लढाईपर्यंत कसा पोहोचला? पश्चिम आशियात व्यापक युद्धभडक्याची शक्यता?
union home minister amit shah remark india will be naxalism free by march 2026
मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त होणार काय? छत्तीसगडमध्ये…
no alt text set
अखेर मुंबईकरांना घडणार भुयारी मेट्रोचा प्रवास… कशी आहे आरे – बीकेसी मेट्रो मार्गिका?
Dr. Babasaheb Ambedkar and Prabodhankar Thackeray’s Influence on Navratri
Dr. Babasaheb Ambedkar on Navaratri: सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे कसे ठरले प्रेरणास्थान?
s jaishankar in pakistan
पाकिस्तानातील ‘शांघाय परिषद’ बैठकीला एस. जयशंकर राहणार उपस्थित; काय आहे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन? त्याचे महत्त्व काय?
Ashokan edict in Dhauli
बौद्ध तत्त्वज्ञान जनमानसात पोहोचवणाऱ्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; पाली आणि प्राकृत का आहेत महत्त्वाच्या?
unesco team inspection Raigad fort
युनेस्कोच्या पथकाने का केली रायगड किल्ल्याची पाहणी? जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता किती?
loksatta analysis indian government new draft guidelines on passive euthanasia
विश्लेषण : इच्छामरणासाठी भारत सरकारकडून मसुदा मार्गदर्शक तत्त्वे तयार… काय आहेत प्रस्तावित तरतुदी?
bjp candidate selection process through lottery in maharashtra
विश्लेषण : चिठ्ठीतील ‘नशीबवानां’कडे लक्ष; भाजपची उमेदवार निवडीची पद्धत राज्यात किती फायदेशीर? ती वादग्रस्त का ठरतेय?

आणखी वाचा: विश्लेषण: Cultural Genocide – एखाद्या संस्कृतीच्या इतिहासातील पाऊलखुणा पुसून टाकणं शक्य असतं का? 

ग्रीक- रोमन साहित्यातही चोलांचा उल्लेख

चोल राजवंशाचे सर्वात जुने संदर्भ इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकातील आहेत. सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये चोलांचा संदर्भ सापडतो. चोल राजवंश हा त्या काळातही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्त्व अबाधित ठेवून होता, हे या अभिलेखीय पुराव्यांच्या आधारे स्पष्ट होते. चोल राजघराणे ते सुरुवातीपासूनच सागरी व्यापारात सक्रिय असल्याने ग्रीक-रोमन साहित्यातही त्यांचे संदर्भ येतात, त्या शिवाय संगम या तामिळ साहित्यात देखील त्यांचा संदर्भ आहे. परंतु हे काही त्रोटक उल्लेख सोडल्यास चोलांच्या प्रारंभिक इतिहासाविषयी भाष्य करणारे पुरावे फारसे उपलब्ध नाहीत. किंबहुना इसवी सनाचा प्रारंभिक कालखंड सोडल्यास नवव्या शतकापर्यंत चोलांचे नेमके अस्तित्त्व कुठे व कसे होते, यावर काही ठोस माहिती उपलब्ध नाही.

इसवी सनाच्या नवव्या शतकात राजा विजयालय चोल याच्या नेतृत्त्वाखाली चोल वंशाचा इतिहास नव्याने लिहिला गेला. त्याच्याविषयी माहिती देणारे अनेक शिलालेख, ताम्रपट अस्तित्त्वात आहेत. इसवी सन ९८५ मध्ये झालेल्या राजा अरुलमोझिवर्मन याच्या काळात चोल साम्राज्य विस्तारले गेले. त्याने राजराजा किंवा राजांचा राजा ही सम्राटाची पदवी स्वीकारली. दक्षिण भारतीय इतिहासाचे अभ्यासक नीलकंठ शास्त्री, त्यांच्या १९५५ सालच्या ‘द चोलाज’ या पुस्तकात राजराजा पहिला याच्या काळात चोल साम्राज्याने भव्यता प्राप्त केल्याचे नमूद केले आहे. शास्त्रींच्या मते, राजराजा पहिल्याच्या उदयानंतर, राजेशाहीमध्ये महत्त्वपूर्ण परिवर्तन झाले, राजा सम्राट झाला. पुराभिलेखामध्ये राजराजा पहिला याने स्वतःला “तिन्ही जगांचा सम्राट” किंवा संपूर्ण विश्वाचा मालक म्हणून संबोधले आहे. या राजवंशांचा इतिहास तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, लक्षद्वीप आणि आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या दक्षिणेकडील भाग या मोठ्या प्रांताशी संबंधित आहे. चोलांच्या काळात या मोठ्या भागावर त्यांनी राज्य प्रस्थापित केले होते. कोरोमंडल किनार्‍यावरून हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून होणाऱ्या व्यापारावर चोलांचे नियंत्रण होते. त्यांनी या सागरी व्यापारासाठी विविध आकारांची जहाजे वापरली. या काळात किनाऱ्यावरील स्थानिक रहदारीसाठी कमी वजनाच्या बोटी वापरात होत्या आणि मलाया तसेच सुमात्रा येथे समुद्रात जाणारी जहाजे मात्र मोठ्या आकाराची होती. चोलांनी सागरी व्यापाराचे महत्त्व ओळखून किनारी भागात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याची नोंद इतिहासात आहे.

चोलांचे कला व स्थापत्य

चोलांच्या काळात कला व स्थापत्य यांना विशेष प्राधान्य दिले गेले. चोल हे परम शिवभक्त होते. त्यांच्या काळात अनेक शिव मंदिरे बांधण्यात आली. राजेंद्र चोलाच्या काळात चोल साम्राज्य हे प्रगतीच्या उच्चांकावर पोहोचले होते. याच्याच काळात शिवाची सर्वाधिक मंदिरे बांधली गेली. ही सर्व मंदिरे मंदिर स्थापत्य शास्त्रातील द्रविडी शैलीतील आहेत. चोल मंदिरांचे ‘सुरुवातीची मंदिरे आणि नंतरची मंदिरे’ अशा दोन गटांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते. सुरुवातीच्या मंदिरांवर पल्लव वास्तुकलेचा प्रभाव आहे तर नंतरच्या काळातही मंदिरांवर चालुक्यांचा प्रभाव आहे. चोलांच्या आधी याभागात पल्लवांच्या अधिपत्याखाली गुहामंदिरे घडविण्यात आली होती. त्यानंतर पल्लवांच्याच काळात एकपाषाणीय मंदिरे घडविण्यात आली, त्यामुळेच चोलांच्या प्रारंभिक कालखंडातील मंदिर स्थापत्यावर पल्लव स्थापत्य कलेचा प्रभाव प्रकर्षाने दिसतो.

आणखी वाचा: विश्लेषण : भारतात आयात होत होता… अमेरिकन बर्फ! का, कशासाठी?

बृहदेश्वर आणि विख्यात नटराज शिव

तंजावरमधील बृहदेश्वर व गंगैकोंडचोळपुरम्‌मधील गंगैकोंडचोळेश्वर ही चोलकालीन मंदिरे त्यांच्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहेत. चोलकालीन मंदिरे ही केवळ प्रार्थनास्थळे नव्हती तर सामाजिक- सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची ठिकाणेही होती. बहुतांश चोल मंदिरे ११ व्या आणि १२ व्या शतकाच्या पूर्वार्धात बांधली गेली. चोल मंदिरे त्यांच्या अप्रतिम वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहेत म्हणूनच त्यांची गणना युनेस्कोच्या जागतिक संरक्षित वारसा स्थळांमध्ये होते. याशिवाय चोलांच्या काळात धातू पासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तिकलेला विशेष राजाश्रय प्राप्त झाला होता. या काळात पंचरसी धातूच्या व कांस्य मूर्ती मोठ्या प्रमाणात घडविण्यात आल्या, त्यांमध्ये नटराज शिवाची विख्यात मूर्ती प्रमुख होती.

एकूणच चोलांच्या काळात केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही साम्राज्य विस्तार झाल्याचे लक्षात येते. चोल राजांनी सागरी व्यापाराचे महत्त्व लक्षात घेवून आग्नेय आशियावर आपले वर्चस्व निर्माण केले. चोलांकडे स्वतःचे असे सक्षम नौदल होते. सर्वांगानेच चोल साम्राज्य हे जगातील समृद्ध राजघराण्यांपैकी एक होते! म्हणूनच आधुनिक भारताच्या समृद्धीच्या प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून त्या प्रवासासाठीचा आदर्श म्हणून चोल साम्राज्याचा उल्लेख वारंवार होत असावा, असे म्हणण्यास वाव आहे!