जुलै २०२३ मध्ये अजित पवारांनी ४२ आमदारांसह सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन भाग झाले. शरद पवार गट आणि अजित पवार गट. निवडणूक आयोगाने अजित पवारांकडे असलेल्या संख्याबळाच्या आधारे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह दिलं. तर शरद पवारांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं. यानंतर नुकतेच महाराष्ट्रातले लोकसभा निवडणुकीचे टप्पेही पार पडले आहेत. अशात शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्या सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळेंवर ठपका ठेवत पक्षाला राम राम करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी शरद पवारांबरोबच आहे

“तूर्तास मी कुठेही जात नाही. अजित पवारांच्या पक्षात मी जाणार नाही किंवा भाजपात जाणार नाही. मी शरद पवारांबरोबरच आहे. पण मी सुप्रिया सुळेंमुळेच पक्ष सोडणार आहे. सगळा त्रास सुप्रिया सुळेंमुळेच होतो आहे. मी जबाबदारीने सांगते आहे की सुप्रिया सुळेंमुळे मी पक्ष सोडते आहे.” असं सोनिया दुहान म्हणाल्या आहेत.

पक्षात काही चांगलं चाललेलं नाही

“मी शरद पवारांचा पक्ष सोडलेला नाही, दुसऱ्या पक्षात गेलेले नाही. तसंच अजित पवारांच्या पक्षातही मी गेलेले नाही. शरद पवारांशी वर्षानुवर्षे एकनिष्ठ असलेले विश्वासू नेते, कार्यकर्ते त्यांची साथ का सोडत आहेत? हा विचार सुप्रिया सुळेंनी केला पाहिजे. काही दशकांपासून शरद पवारांबरोबर आहेत जे पक्ष सोडत आहेत. सुप्रिया सुळेंनी याचा नक्कीच विचार करावा पाहिजे. आम्ही शरद पवारांचे निकटवर्तीय आहोत जवळचे आहोत आम्ही आता पक्ष सोडायचं ठरवलं आहे याला तुम्ही ऑल इज वेल म्हणाल का? नक्कीच नाही. शरद पवारांच्या पक्षात फार काही बरं चित्र नाही.” असं सोनिया दुहान म्हणाल्या आहेत. ANI ला दिलेल्या छोट्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे पण वाचा- सोनिया दुहान यांची खंत, “शरद पवार दैवत, पण सुप्रिया सुळे आमच्या लीडर होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे मी पक्षात..”

आमचा उद्रेक झाला आहे कारण..

“आम्हाला सुप्रिया सुळेंबाबत फार बोलायला लावू नका. जे काही सहन करायचं होतं ते आम्ही सहन केलं. एखादी गोष्ट जास्त काळ दाबून ठेवली की ती फुटून जाते. तसा आमचा उद्रेक झाला आहे. आमची शरद पवारांशी चर्चा झाली होती. शरद पवारांनी मला चर्चा करु असंही म्हटलं होतं. मात्र २३ मे रोजी मला सुप्रिया सुळेंनी फोन केला. त्या असं काही बोलल्या की आता पक्षाला राम राम करायचीच वेळ आली आहे. मी सध्या घरीच बसणार आहे. राजकारण नंतर पाहू, काही पाठिंबाच दिला जात नाही. सेल्फी काढल्याने आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करुन पक्ष चालत नसतो. सुप्रिया सुळेंना आणि त्यांच्या आसपास वावरणाऱ्यांना ही गोष्ट थोडी समजली पाहिजे. अशी माणसं चालणार नाहीत जे लीडर्स नाहीत. मी जबाबदारीने सांगते आहे की सुप्रिया सुळेंमुळे मी पक्ष सोडला आहे. धीरज शर्मा यांनीही याच कारणामुळे पक्ष सोडला आहे. मला काढून टाकतील किंवा मी राजीनामा देईन. आजवर साधा फोन कुणाला आलेला नाही. नाराजीचं कारण विचारण्यात आलेलं नाही.” असंही सोनिया दुहान यांनी स्पष्ट केलं आहे.

मी सुप्रिया सुळेंमुळेच पक्ष सोडला

इतर लोक काय करतात? त्यांचं म्हणणं काय हे मला माहीत नाही. मी आणि धीरज शर्मा सुप्रिया सुळेंमुळे पक्ष सोडतो आहोत. शरद पवार पक्षाचे अध्यक्ष होते तोपर्यंत सगळं बरं चाललं होतं. सुप्रिया सुळेंकडे पक्ष गेल्यानंतर वातावरण बिघडलं यावर विचार झाला पाहिजे. सध्या माझी रणनीती काहीही नाही. डोक्यावरुन पाणी गेलं आहे त्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. असं सुप्रिया दुहान म्हणाल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All is not well in sharad pawar party we are leaving party due to supriya sule scj
Show comments