अलाहाबाद विद्यापीठातील वाद
संशोधक विद्यार्थिनी म्हणून मला देण्यात आलेल्या प्रवेशाच्या चौकशी आदेशामागे राजकीय हेतू आहेत, असा आरोप अलाहाबाद विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष असलेल्या रिचा सिंह हिने केला. विद्यापीठातील अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधक गटानेच हे घडवून आणले, असा आरोप तिने केला आहे.
अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या रजनीश त्रिपाठी याने तिच्या प्रवेशाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्रिपाठी याने रिचाविरुद्ध अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. त्याने अभाविपचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली नसली तरी त्याचे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळणारे आहेत. त्याने रिचा सिंह हिला राखीव जागातून २०१३ मध्ये प्रवेश देण्यात आल्याची तक्रार केली होती. विद्यापीठाने याबाबत काही निर्णय घेतला नसला तरी चौकशी अहवालातील तपशील मला समजला आहे, माझ्यावर त्रिपाठी याने केलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत व त्यात विद्यापीठ अधिकाऱ्यांचा त्याला पाठिंबा आहे. माझ्या प्रवेशात बेकायदेशीर काही नाही. उलट जर काही त्रुटी असतील तर त्याचा दोष विद्यार्थ्यांना जात नाही. कला शाखेच्या अधिष्ठात्यांनी जो चौकशी अहवाल दिला आहे त्यात माझ्या भूमिकेचा विचार केलेला नसून, माझी शैक्षणिक कारकीर्द व विद्यापीठ संघटनेची अध्यक्ष या नात्याने असलेली विश्वासार्हता धोक्यात आणण्याचा हा प्रकार आहे, असे रिचा हिने सांगितले. स्वातंत्र्योत्तर काळात या विद्यापीठ संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झालेली मी पहिलीच महिला आहे. विद्यापीठाच्या अनेक निर्णयांना हरकत घेतल्याने विद्यापीठाने मला अडचणीत आणले. कुलगुरूंच्या विशेष कामकाज अधिकारीपदी दोषारोप असलेल्या संशोधकाची नेमणूक झाली होती त्याला मी विरोध केला होता. कुलगुरूंकडे मी भेटीची वेळ मागितली होती, पण त्यांनी ती कधीच दिली नाही. अभाविपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे मात्र ते वेळोवेळी ऐकून घेत होते असा आरोप तिने केला आहे. प्रशांत भूषण व सिद्धार्थ वरदराजन यांना विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी मी निमंत्रित केले, पण योगी आदित्यनाथ यांच्या प्रस्तावित भेटीला विरोध केला. त्यानंतर स्थिती बिघडत गेली. आदित्यनाथ यांनी नंतर त्यांची भेट रद्द केली. आज मी जनता दल संयुक्तचे नेते के. सी. त्यागी यांची भेट घेऊन हा विषय संसदेत उपस्थित करण्याची विनंती त्यांना केली आहे.
