Amit Shah On Bihar Elections 2025 : बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांचा बिहारमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. अनेक दिग्गज नेते मंडळी बिहारच्या विविध शहरात जाऊन सभा, रॅली आणि बैठका घेत आहेत. ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार असून १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी म्हणजे निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका सभेत बोलताना लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव आणि सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

‘लालू प्रसाद यादव यांना त्यांच्या मुलाला (तेजस्वी यादव) मुख्यमंत्री बनवायचंय, तर सोनिया गांधींना त्यांच्या मुलाला (राहुल गांधी) पंतप्रधान बनवायचं आहे, पण या दोन्हीही जागा रिक्त नाहीत’, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

अमित शाह नेमकं काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दरभंगा येथील एका सभेत बुधवारी बोलताना विरोधी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. अमित शाह म्हणाले की, “बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव हे त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवू इच्छित आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी ह्या त्यांच्या मुलाला देशाचा पंतप्रधान बनवू इच्छित आहेत. पण ही दोन्हीही पदे रिक्त नाहीत”, अशा शब्दांत अमित शाह यांनी लालू प्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांच्यावर खोचक टीका केली.

“तसेच लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळा प्रकरण आणि नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा या प्रकरणात सहभागी आहेत. दुसरीकडे काँग्रेसवर १२ लाख कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत आरोप आहेत”, असं म्हणत अमित शाह यांनी लालू प्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांच्यावर घणाघात केला.

बातमी अपडेट होत आहे.