Amit Shah on Waqf Board Claims Mahadev Mandir Wadange : लोकसभेत बुधवारी (२ एप्रिल) वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झालं. तत्पूर्वी सभागृहात झालेल्या चर्चेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील महादेव मंदिराचा उल्लेख केला. या मंदिराच्या जागेवर वक्फ बोर्डाने दावा केल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. तसेच हे मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून त्या जागेवर आहे, असंही सांगितलं. दरम्यान, या गावातील हिंदू व मुस्लीम ग्रामस्थांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत.

वडणगे गावातील एक ग्रामस्थ एबीपी माझाला म्हणाले, “या महादेव मंदिराचं मोठं महात्म्य आहे. करवीर ग्रंथातही त्याचा उल्लेख आहे. करवीर ग्रंथात या गावाला वडणगे करवीर काशी असं म्हटलं आहे. मात्र, आता वक्फ बोर्ड या परिसरावर दावा करत आहे. वक्फ बोर्डाला ही जागा हवी आहे. वक्फ बोर्ड स्वतःची मालकी सांगून मंदिराची जागा हस्तगत करू शकतं.”

दोन्ही मिळकती भिन्न, वक्फने दावा केलेला नाही : मुस्लीम ग्रामस्थांचं स्पष्टीकरण

दरम्यान, गावातील एका मुस्लीम ग्रामस्थाने म्हटलं आहे की आजवर वक्फने या पवित्र मंदिराच्या जागेवर दावा केलेला नाही. माझ्या मित्राने जो दावा केला आहे किंवा काही मंडळी तथाकथित दावा करत आहेत त्यांनी असे अधिकृत दस्तऐवज दाखवावे. वक्फने या जागेवर दावा केल्याचा कागदी पुरावा दाखवावा. मुळात मंदिराची मालमत्ता सिटी सर्वेक्षण क्रमांक ११७ मध्ये आहे. तर मुस्लीम समुदायाची मिळकत सिटी सर्वेक्षण क्रमांक ८९ मध्ये आहे. दोन्ही मिळकती भिन्न आहेत.

गावातील आणखी एका तरुणाने यावर भाष्य केलं आहे. तो म्हणाला, “ही जागा वडणगे गावची आहे. मंदिराचा परिसर ग्रामपंचायतीच्या मालकीचा आहे. शासकीय कागदपत्रांवर ग्रामपंचायत वडणगे असाच उल्लेख आहे. या जागेवर मुस्लीम समाजाने वक्फ बोर्डाचं नाव लावलेलं. परंतु, दिवाणी न्यायालयाने ते रद्द केलं आहे. या जागेवर जत्रा भरते.

अमित शाह काय म्हणाले होते?

अमित शाह म्हणाले, “यूपीएच्या काळात हरियाणातील १४ गावे वक्फला दिली आहेत. प्रयागराजमधील चंद्रशेखर आझाद पार्क वक्फला दिलं आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील वडणगे गावात महादेवाचं जुनं मंदिर आहे. त्या मंदिरावर वक्फने दावा केला आहे. बीडमध्ये कंकाळेश्वर मंदिराची १२ एकर जमीन आहे ती देखील वक्फने घेतली आहे.”