Dr. Manmohan Singh Death: मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्या सरकारवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २०११ साली मनमोहन सिंग सरकारविरोधात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोठं आंदोलन छेडलं होतं. दिल्लीच्या आझाद मैदान व रामलीला मैदानावर अण्णा हजारे व त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर आज अण्णा हजारेंनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना २०११ च्या आंदोलनाचाही उल्लेख केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मनमोहन सिंग यांनी संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था बदलली”

अण्णा हजारेंनी मनमोहन सिंग यांच्याबाबत भावना व्यक्त करताना त्यांच्य कार्यकर्तृत्वाबाबत गौरवोद्गार काढले. “प्रत्येकजण या जगात येत असतो, जात असतो. कोण आलं, कोण गेलं हे फारसं कुणाला कळत नाही. पण काही लोक असे असतात, जे आपल्या आठवणी कायम मागे ठेवून जातात. समाजात काहीतरी करून जातात. आपला ठसा उमटवून जातात. मनमोहन सिग यांच्या नेहमी देशाबाबत विचार करायचे. त्यामुळेच या देशाची अर्थव्यवस्था बदलली, त्यात मनमोहन सिंग यांचं फार मोठं योगदान आहे”, असं अण्णा हजारे म्हणाले.

Dr. Manmohan Singh Death: “मी मुख्यमंत्री असताना…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागवल्या मनमोहन सिंग यांच्या आठवणी; म्हणाले, “दिल्लीत आल्यानंतर माझं…”

“मनमोहन सिंग यांनी पूर्ण देशाची अर्थव्यवस्था बदलली. या अर्थव्यवस्थेला नवीन दिशा मिळाली. आजही आपला देश प्रगतीपथावर चालत आहे. तेव्हा भ्रष्टाचाराच्या विरोधात मी आंदोलन करत होतो. तेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते. दिल्लीत दोनदा त्यांच्या घरी बैठका झाल्या आणि त्यांनी तेव्हा तातडीने निर्णय घेतले”, अशा शब्दांत अण्णा हजारेंनी आंदोलनावेळच्या आठवणींना उजाळा दिला.

“आठवणींच्या रुपात ते कायम जिवंत राहतील”

“समाज आणि देशासाठी आस्था, प्रेम असेल तर किती चांगलं काम करता येतं हे मनमोहन सिंग यांच्या उदाहरणावरून दिसत आहे. मनमोहन सिंग आज शरीरानं गेले आहेत, पण आठवणींच्या रुपात ते कायम जिवंत राहतील. त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो”, असं अण्णा हजारे म्हणाले.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. संध्याकाळी त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री ९ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मनमोहन सिंग यांच्या निधनावर देशभरातून राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त केला जात आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील आजी-माजी राष्ट्रप्रमुखांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांच्याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare speaks on formar pm manmohan singh death pmw