दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (०७ जून) दिल्लीतल्या बवाना परिसरामधील दरियापूर गावातील स्कूल ऑफ स्पेशलायज्ड एक्सलन्सचं उद्घाटन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केजरीवाल भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. केजरीवाल यावेळी इतके भावूक झाले होते की, त्यांचा कंठ दाटून आला होता. त्यांना खूप रडू येत होतं. परंतु ते रडणं त्यांनी रोखून धरलं होतं. परंतु तरीदेखील एक क्षण असा आला जेव्हा त्यांना त्यांच्या डोळ्यातले अश्रू रोखता आले नाहीत. तशाच परिस्थितीत त्यांनी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा उल्लेख केला आणि म्हणाले आज मला मनीषजींची खूप आठवण येत आहे. हे त्यांचं स्वप्न होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केजरीवाल यांनी यावेळी भाजपा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. केजरीवाल म्हणाले, आपण सुरू केलेली ही शिक्षणाची क्रांती थांबावी असं त्यांना (भाजपा) वाटतं. परंतु आम्ही असं होऊ देणार नाही. मनीषजींनी याची सुरुवात केली होती. सर्व मुलांना उत्तम शिक्षण मिळावं अशी मनीष सिसोदियांची इच्छा होती. इतक्या चांगल्या माणसाला भाजपा सरकारने तुरुंगात टाकलं आहे. ते उत्तम शाळा बांधत नसते किंवा शिक्षण व्यवस्था सुरळीत करत नसते तर ते आज तुरुंगात नसते.

हे ही वाचा >> “…म्हणून कोल्हापुरात जमाव प्रक्षुब्ध झाला”, शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “गाड्यांची मोडतोड झाल्याने…”

आम्हाला मनीष सिसोदिया यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, असा निर्धार अरविंद केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केला. केजरीवाल म्हणाले, ते (सिसोदिया) लवकरच तिहार तुरुंगातून बाहेर येतील. सत्याचा कधीच पराजय होत नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांना उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकण्याच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. केजरीवाल म्हणाले, प्रत्येक मुलाने शिक्षण घेतलं पाहिजे, असे सिसोदियांचं स्वप्न होतं. त्याच दिशेने ते क्रांतिकारी कार्य करत होते. असे असूनही त्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात डांबून ठेवलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal gets emotional for manish sisodia at inauguration of educational institution asc