दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांच्यावर कथित मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी त्यांना आज अटक करण्यात आली. स्वाती मालिवाल यांच्या जबाबानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, बिभव कुमार यांना अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून भाजपाला इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आम आदमी पक्षाच्या मागे का लागले आहेत हे लोक. एकामोगामाग एकाला हे तुरुंगात टाकत आहेत. संजय सिंहांना तुरुंगात टाकलं, आज माझ्या पीएला टाकलं. आता हे म्हणतात की राघव चढ्ढा यांनाही जेलमध्ये टाकणार. सौरभ, अतिशी यांनाही तुरुंगात टाकणार. मी हा विचार करतोय की हे आम्हाला तुरुंगात का टाकत आहेत. आमचा गुन्हा काय?” असा प्रश्न दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केला.

“आमचा गुन्हा एकच की आम्ही सरकारी शाळा चांगल्या बनवल्या. आम्ही गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं. हे लोक तसं करू शकले नाहीत. त्यामुळे दिल्लीतील सरकारी शाळा यांना बंद करायच्या आहेत. आम्ही दिल्लीकरांसाठी मोहल्ला क्लिनिक बनवले, सरकारी रुग्णालये बनवली, चांगल्या सरकारी उपचारांची सुविधा उपलब्ध करून दिली. भाजपा हे करू शकली नाही. त्यामुळे ते मोहल्ला क्लिनिक आणि सरकारी रुग्णालये बंद करू इच्छितात. पूर्वी दिल्लीत १०-१० तास वीज भारनियमन असे. आम्ही २४ तास वीज ठेवली. आम्ही दिल्लीकरांना मोफत वीज दिली. मोफत वीज देणं सोपं काम नाहीय”, असंही केजरीवाल म्हणाले.

हेही वाचा >> अखेर बिभव कुमार यांना अटक; स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून कारवाई

“मी पंतप्रधांना सांगू इच्छितो की तुम्ही जेल-जेलचा खेळ खेळताय. मी उद्या १२ वाजता आपच्या सर्व मोठ्या नेत्यांबरोबर भाजपाच्या उच्चालयात येत आहे. तुम्हाला ज्यांना ज्यांना तुरुंगात टाकायचं आहे त्यांना टाका. तुम्हाला वाटतंय की आपच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं तर पक्ष संपेल. पण आप संपणाऱ्यातला नाही. आम आदमी पक्ष एक विचार आहे. आपच्या जितक्या नेत्यांना तुरुंगात टाकाल तितक्या पटीने नेते हा देश घडवतील. त्यामुळे मोदीजी उद्या ठीक १२ वाजता भाजपा कार्यालयात भेटा!”, असं आव्हान अरविंद केजरीवाल यांनी दिलं.

बिभव कुमार यांच्याकडून स्वाती मालिवाल यांना मारहाण?

 १३ मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मला मारहाण करण्यात आली, असा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला होता. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे स्वीय साहायक बिभव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या पथकाने स्वाती मालिवाल यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाबही नोंदवला होता. त्यावेळी स्वाती मालिवाल यांनी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली होती. तत्पूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाने बिभव कुमार यांना समन्स बजावले होते. यानुसार बिभव कुमार यांना १७ मे रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले होते. तसेच दिल्ली पोलिसांनी बिभव कुमार यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला होता.

स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणावर आपची भूमिका काय?

या प्रकरणावर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी एका पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. “ही घटना अत्यंत निंदनीय आहे. अरविंद केजरीवाल यांना भेटायला स्वाती मालिवाल गेल्या होत्या. त्या जेव्हा केजरीवाल यांची वाट बघत होत्या तेव्हा बिभव कुमार यांनी त्यांच्याशी गैरव्यवहार केला आणि कथित मारहाणही केली. या सगळ्या घटनेनंतर आता स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणात लेखी तक्रार दिली आहे. दिल्ली पोलिसांचं पथक स्वाती मालिवाल यांच्या घरी गेलं होतं तिथे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला.” असे ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwals direct challenge to modi after bibhav kumars arrest in swati malival assualt case sgk