पश्चिम बंगालमध्ये ‘एनआयए’च्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना शनिवारी (ता. ६ एप्रिल) समोर आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक भूपतीनगर येथे एका प्रकरणाचा तपास करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर जमावाकडून हल्ला करण्यात आला होता. जमावाने केलेल्या दगडफेकीत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच दोन अधिकारीही जखमी झाले होते. आता या घटनेत तपासासाठी गेलेल्या ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमके प्रकरण काय ?

डिंसेबर २०२२ च्या भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भातील तपास करण्यासाठी एनआयएचे एक पथक भूपतीनगरमध्ये दाखल झाले होते. या बॉम्बस्फोट प्रकरणात तीन जणांचा मुत्यू झाला होता. या बॉम्बस्फोट प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. यासंदर्भात काहींना नोटीसा देण्यात आल्या होत्या. मात्र, ते चौकशीसाठी हजर झाले नाही. यानंतर एनआयएचे पथक त्यांना ताब्यात घेण्यासाठी भूपतीनगरमध्ये दाखल झाले होते. यावेळी पथकावर जमावाने हल्ला केला. ही घटना ६ एप्रिल रोजी पहाटे घडली.

हेही वाचा : ‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”

जमावाने हल्ला केल्याच्या काही तासांनंतर आता पोलिसांनी एनआयएच्या अधिकाऱ्यांवर विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर पोलिसांनी शनिवारी रात्री भूपतीनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आयपीसीच्या कलम ३५४ अंतर्गत एनआयएच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. दरम्यान, एनआयए अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घराचे दरवाजे तोडून महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

सीपीआय (एम)चे ज्येष्ठ नेते सुजन चक्रवर्ती यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “राज्य सरकार अशा प्रकारच्या घटनांना चिथावणी देत ​​असून एनआयएच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला. त्या घटनेत सहभागी असलेल्या कोणालाही पोलिसांनी अटक केली नाही. मात्र, उलट एनआयएच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. हे खूप दुर्दैवी आहे”, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काय म्हणाल्या होत्या?

एनआयएच्या अधिकाऱ्यांवर हल्ला झाला, यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या, “एनआयएने मध्यरात्री छापा का टाकला? त्यांनी पोलिसांची परवानगी घेतली होती का? मध्यरात्री आलेल्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीला जशी प्रतिक्रिया द्यायला हवी होती, तशीच स्थानिकांनी दिली”, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on nia team and case of molestation was registered by the west bengal police against the nia team marathi news gkt