Karnataka Gold Heist : देशातील सर्वात मोठ्या चोरीच्या घटनांपैकी एक असलेल्या बँकेतीतल चोरीची यशस्वीपणे उकल करण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांनी शुक्रवारी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या चोरीच्या घटनेत ५३ कोटी रूपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणात पोलिसांनी तीन व्यक्तींना अटक केली आहे, ज्यापैकी एक हा बँकेच्या शाखेतून बदली झालेला मॅनेजर असल्याचे आढळून आले आहे.
५८.९७ किलो दागिन्यांची चोरी

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

दरोड्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विजयकुमार मिरियाला (४१)त्याचा सहकारी आणि एका खाजगी कंपनीत काम करणारा चंद्रशेखर नेरेल्ला (३८) आणि सुनील नरसिंहलू मोका (४०) यांचा समावेश आहे. विजयपुरा जिल्ह्यातील मनागुली शहरात कॅनरा बँकेत २५ मे रोजी ही चोरीची घटना घडली होती. यामध्ये ५८.९७ किलो सोन्याचे दागिने चोरीला गेले होते.

विजयपुरा जिल्ह्यात माध्यमांशी संवाद साधताना पोलिस अधीक्षक लक्ष्मण निंबार्गी यांनी सांगितले की, या प्रकरणात आरोपींनी तपास करणाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केले. मात्र असे असून देखील याचा उलगडा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मरियाला हा मानागुली शहरातील कॅनरा बँकेच्या शाखेत मॅनेजर होता. पण त्याची बदली ९ मे रोजी विजयपुरा जिल्ह्यातील रोनिहाल शाखेत झाली. त्याची बदली झाल्यानंतरच बँकेत चोरी करण्याचा त्याचा प्लॅन होता, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने आणि १०.५ किलो ग्रॅम सोन्याचे दागिने ज्यांची किंमत सुमारे १०.७५ कोटी आहे, जप्त केले आहेत.

चोरलेले दागिने वितळवून तयार केलेले सोन्याचे बार देखील पोलि‍सांनी जप्त केले आहेत. सोनं कोणाच्या नजरेत न येता वाहून नेता यावे यासाठी चोरट्यांनी दागिने वितळवण्याची शक्कल लढवली होती. पोलिसांना संशय आहे की या गु्न्ह्यात अजूनही काही लोक सहभागी होते. तसेच इतर सोन्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तपास सुरू करण्यात आला तेव्हा हे काम बँकेतीलच कोणीतरी केल्याचा संशय होता. “आम्हाला आढळून आले की मिरियाला याने त्याच्या सहकाऱ्यांना त्याची शाखेतून बदली होण्याच्या आधीच मार्च-एप्रिलमध्येच बँकेच्या चाव्या पुरवल्या होत्या. त्यानंतर या गटाने बनावट चाव्या तयार केल्या आणि चोरीची तयारी म्हणून त्या व्यवस्थित काम करतात का हे देखील तपासून पाहिले. चोरीची वेळ देखील विचारपूर्वक निवडली होती. मिरियालने त्याच्या योजनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्याची बदली होईपर्यंत वाट पाहिली, जेणेकरून त्याच्यावर लगेचच कोणी संशय घेणार नाही,” असे पोलिसांनी सांगितले.

आरसीबीचा पराभव झाला अन्….

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे आरोपी सुरुवातीला २३ मे रोजीच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – सनरायझर्स हैदराबाद या दोन संघातील सामन्याच्या वेळीच ही चोरी करण्याच्या ते विचारात होते. त्यांचा विचार होता की जर सामना आरसीबीने जिंकला तर लोक आनंद साजरा करत असतील आणि ते करत असलेल्या कृतीकडे कोणाचे लक्ष जाणार नाही. मात्र आरसीबी संघ सामना हरला तेव्हा त्यांनी त्यांची योजना एक दिवस पुढे ढकलली, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

आरोपींकडून कित्येक महिने अभ्यास

आरोपींनी कित्येक महिने बँकेचे लोकेशन आणि सीसीटीव्ही कव्हरेजचा अभ्यास करण्यासाठी घालवले. इतर राज्यात घडलेल्या बँकेवतील चोऱ्यांचा देखील त्यांनी अभ्यास केल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर चोरी केल्यानंतर पोलिसांचे लक्ष विचलीत करण्यासाठी त्यांनी बँकेत केशर, हळद आणि आणि ब्लोटॉर्च ठेवले होते. त्यांची अपेक्षा होती की पोलिसांना वाटेल की गुन्हेगार हे तामिळनाडू किंवा केरळचे होते. या भागात अशा वस्तू जादूटोणा करण्यात आलेल्या दरोड्याच्या घटनांमध्ये पाहायला मिळतात, असे पोलिसांनी सांगितले.

चित्रपटांपासून प्रेरणा घेत आरोपींनी दरोडा टाकला त्यानंतर त्यांची वाहने सापडू नयेत म्हणून त्यांच्या दुचाकी ट्रकने नेल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर त्यांनी बँकेच्या सुरक्षा प्रणालीत देखील फेरफार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे दुसरीकडे वळवले, हाय-मास्ट लाइटिंगसाठी केबल्स कापल्या, तसेच बँकेतून नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर (NVR) देखील गायब केला.

एक सुगावा आणि आरोपी जाळ्यात अडकले

“आरोपींनी पकडण्यासाठी आठ पथके स्थापन करण्यात आली होती. आम्हाला मिळालेल्या सर्वात महत्त्वाच्या सुगाव्यांपैक एक म्हणजे एका चोरी होण्याच्या काही तास आधी आणि नंतर झालेली कारची मूव्हमेंट. ती कार मिरियाला याच्या नावावर रजिस्टर असल्याचे आढळून आले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला”, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank manager orchestrated heist of 58 97 kg of gold ornaments worth rs 53 crore in karnataka three accused arrested rak