देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असताना दुसरीकडे यावरुन देशात राजकीय आरोप प्रत्यारोपांच्याही फैरी झाडल्या जात आहेत. सत्ताधाऱ्यांकडून कशाप्रकारे यासाठी आधीचं सरकार जबाबदार असल्याचा दावा केला जातोय तर सध्याची देशातील परिस्थिती ही केंद्रातील मोदी सरकारच्या अपयशामुळे आल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. असं असतानाच दुसरीकडे मोठे राजकीय पक्ष त्यांनी केलेल्या कामाची माहिती सोशल नेटवर्किंगवरुन पोस्ट करताना दिसत आहे. मात्र यामध्येही करण्यात येणारे दाव्यांची सत्यता पडताळून त्यावरुनही विरोधी पक्ष एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. सकारात्मक बातम्यांच्या नावाखाली सरकार स्वत:चा प्रचार करत असून हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रशांत किशोर यांनी ट्विटरवरुन सरकारवर निशाणा साधालाय. “एक शोकाकुल राष्ट्र म्हणून आपण सध्या करोना परिस्थितीचा सामना करत आहोत. आपल्या आजूबाजूस घडत असलेल्या शोकांतिकांना आपण सामोरे जात असतानाच खोटी माहिती आणि प्रचार हा सकारात्मक बातम्यांच्या नावाखाली पसरवला जातोय, हे लज्जास्पद आहे,” असं किशोर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच, “सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला सरकारच्या आंधळ्या प्रचारकांपैकी एक होण्याची गरज नाहीय,” असा टोलाही किशोर यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करोना कालावधीमध्ये खूप काम करत असल्याची एक लिंक मंगळवारी भाजपाच्या अनेक नेत्यांनी शेअर केल्याने त्यावरुन आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्याचसंदर्भात किशोर यांनी हे ट्विट केल्याचं बोललं जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकींमध्ये प्रशांत किशोर यांनी भाजपा दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही असं भाकीत वर्तवलं होतं. जर भाजपाने दोन अंकी आकडा ओलांडला तर आपण संन्यास घेऊ असं ते म्हणाले होते. पण आपलं भाकीत खरं ठरल्यानंतरही ते संन्यास घेत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. यावर बोलताना त्यांनी आपल्याला संन्यास घ्यायचा होता, त्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होतो. पश्चिम बंगालच्या निमित्ताने ही संधी मिळाली असल्याचं ते म्हणाले. राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच किशोर यांनी थेटपणे सरकारवर टीका केलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Being positive we don not have to become blind propagandist of the govt says prashant kishor scsg