Bengaluru Consumer Court on Matrimony Portal : बंगळुरूमधील ग्राहक न्यायालयाने एका व्यक्तीला वधू शोधून देण्यास असमर्थ ठरल्याबद्दल मॅट्रिमोनियल पोर्टलला (लग्न जुळवण्यासाठी वापरलं जाणारं संकेस्थळ/अ‍ॅप) ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बंगळुरूतील एम. एस. नगरमधील रहिवासी विजय कुमार हे त्यांच्या मुलासाठी वधू शोधत होते. त्याचवेळी त्यांना दिलमिल मॅट्रिमोनियल पोर्टलची माहिती मिळाली. या कंपनीचं कार्यालय कल्याण नगरमध्ये आहे. विजय कुमार यांनी त्यांच्या मुलाची या पोर्टलवर नोंदणी केली. मात्र, अनेक प्रयत्न करुनही त्यांना या पोर्टलच्या मदतीने सूनबाई शोधता आली नाही. परिणामी त्यांना या पोर्टलविरोधात ग्राहक न्यायालयाचं दार ठोठावलं.

विजय कुमार हे १७ मार्च रोजी त्यांच्या मुलाचे दस्तावेज व फोटो घेऊन दिलमिल या मॅट्रिमोनियल पोर्टलच्या कार्यालयात गेले होते. पोर्टलच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विजय कुमार यांना ३० हजार रुपये शुल्क भरण्यास सांगितलं. त्यांनी ते शुल्क भरलं. त्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं की ४५ दिवसांमध्ये आम्ही तुमच्या मुलासाठी वधू शोधून देऊ.

हे ही वाचा >> गावच्या महिलेचा ‘आंखों में कजरा बालों में गजरा’ गाण्यावर तुफान डान्स; एखाद्या हिरोईनलाही जमणार नाही अशी स्टेप; VIDEO एकदा बघाच

पोर्टलच्या कर्मचाऱ्यांकडून विजय कुमार यांचा अपमान

४५ दिवसांनंतरही दिलमिल मॅट्रिमोनियल पोर्टल व तिथले कर्मचारी विजय कुमार यांचे पुत्र बालाजीसाठी वधू शोधू शकले नाहीत. या काळात व त्यानंतरही विजय कुमार यांना अनेकदा दिलमिलच्या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागले. अनेकदा त्यांना कार्यालयात बसवून ठेवण्यात आलं, त्यांना वाट पाहायला लावली. ३० एप्रिल रोजी विजय कुमार दिलमिलच्या कार्यालयात गेले व त्यांनी त्यांचे पैसे मरत मागितले. मात्र, तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला तसेच त्यांना शिवीगाळही केली. त्यांची टिंगल केली. अश्लाघ्य भाषेत त्यांचा अपमान केला.

हे ही वाचा >> VIRAL VIDEO : वय म्हणजे नुसता आकडा! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हातात हात धरून नाचणारे आजी-आजोबा, रोमँटिक डान्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

न्यायालयाने ठोठावला ६० हजारांचा दंड

त्यानंतर विजय कुमार यांनी न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला. ९ मे रोजी विजय कुमार यांनी दिलमिल पोर्टलला कायदेशीर नोटीस पाठवली. मात्र पोर्टलने त्यांच्या नोटिशीला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही. याप्रकरणी अनेक दिवस सुनावणी चालली. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी ग्राहक न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला. न्यायालयाने त्यांच्या आदेशात म्हटलं आहे की तक्रारदाराला त्याच्या मुलासाठी एकही वधू सुचवण्यास हे पोर्टल अपयशी ठरलं आहे. तसेच तक्रारदाराने दिलमिलच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली तर त्याकडे पोर्टलने दुर्लक्ष केलं. त्यांनी तक्रारदाराचे पैसे त्याला परत दिले नाहीत. त्यामुळेच या मॅट्रिमोनियल पोर्टलला आम्ही दंड ठोठावत आहोत.