कामावरून घरी परतणाऱ्या सहा महिन्यांची गर्भवती नर्सचा पाठलाग करत तिची छेड काढली असल्याचा प्रकार बंगळुरूत उघड झाला आहे. याप्रकरणी इलेक्ट्रॉनिक्स सिटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी २६ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.
३२ वर्षीय गर्भवती महिला गेल्या आठवड्यात आरोग्य केंद्रातून सुटल्यानंतर घरी परतत होती. त्यावेळी कोनाप्पाना अग्रहारा बीएमटीसी बस स्टॉप येथे SUV चालकाने तिचा पाठलाग केला. तसंच, तिची छेड काढली. प्रत्येक तासासाठी एक लाख रुपये देण्याचीही त्याने ऑफर दिली. म्हणून संतापलेल्या महिलेने त्याच्या कानाखाली लगावली. भर रस्त्यात महिलेने कानाखाली लगावल्याने आरोपीनेही तिच्यावर हात उगारला. आरोपीने तिच्या चेहऱ्यावर आणि कानावर जोरात लगावली. यामुळे पीडितेच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला.
दरम्यान, पीडितेने तिच्या मदतीसाठी तिच्या एका सहकाऱ्याला बोलावले. दोघांनीही तत्काळ पोलीस ठाणे गाठून संबंधित घटना पोलिसांना कथन केली. इलेक्ट्रॉनिक्स सिटी पोलिसांना तक्रार मिळाल्यानंतर लगेचच तपास सुरू करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली. अविनाश असे आरोपीचे नाव असून तो हेब्बागोडीजवळील कम्मासांद्राचा रहिवासी राहतो. तो एका खासगी कंपनीत चालक आहे.
“आम्ही पीडितेची तक्रार नोंदवून घेतली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आम्ही अविनाशला अटक केली. त्याच्यावर लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे आणि त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे”, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालात नमूद केले आहे .