Bihar Election Poll 2025 Dates and Schedule : बिहारमध्ये राबवलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) उपक्रमानंतर राज्यातील अंतिम मतदारयादी मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, आता राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. सध्याच्या विधानसभेची मुदत येत्या २२ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला २२ नोव्हेंबरपूर्वी निवडणूक घ्यायची आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने येत्या नोव्हेंबर महिन्यात बिहारची विधानसभा निवडणूक घेण्याचं ठरवलं आहे. ही निवडणूक दोन टप्प्यांमध्ये पार पडेल. तर, १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केलं की यावेळी बिहारची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये पार पडेल. ६ नोव्हेंबर (गुरुवार) व ११ नोव्हेंबर (मंगळवार) रोजी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया राबवली जाईल. तर, १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. १६ नोव्हेंबरआधी निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

अशी पार पडेल निवडणूक

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १० ते १७ ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर, दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी १३ ते २० ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. १८ ऑक्टोबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची पडताळणी केली जाईल. तर २१ ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची पडताळणी पार पडेल. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २० ऑक्टोबर तर, दुसऱ्या टप्प्यातील अर्ज मागे घेण्यासाठी २३ ऑक्टोबर ही अंतिम तारीख असेल.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, “आम्ही बिहारच्या राजकारण सक्रीय असलेल्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांच्या सूचना घेतल्या आणि निवडणुकीचा आराखडा तयार केला आहे. आम्ही बिहारच्या जनतेला सांगू इच्छितो की यावेळी बिहारची निवडणूक केवळ बिहारमधील मतदारांसाठीच सोपी नसेल तर अधिकाऱ्यांसाठी देखील सुलभ असेल. कायदा व सुव्यवस्थेवर पूर्ण लक्ष ठेवलं जाईल. यावेळची निवडणूक ही पूर्णपणे पारदर्शक व शांततापूर्ण वातावरणात पार पडेल. ही आजवरची सर्वात चांगली विधानसभा निवडणूक असेल.

४० जागा राखीव

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. यापैकी २०३ जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. तर, ३८ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी दोन जागा राखीव आहेत.

राज्यात ७.४३ कोटी मतदार

राज्यात ७.४३ कोटी मतदार असून यामध्ये ३.८२ कोटी पुरुष व ३.५० कोटी महिला मतदार आहेत. यासह १७२५ तृतीयपंथी मतदार आहेत. एकूण मतदारांपैकी ४ लाख मतदारांचं वय ८५ पेक्षा जास्त आहे. राज्यात १४.०१ लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तर, १.६३ कोटी मतदार २० ते २८ वर्षे वयोगटातील आहेत.