Nitish Kumar NDA Bihar Assembly Election Results 2025: बिहार निवडणुकीच्या निकालाचा दिवस आज आहे. एनडीएचं सरकार येणार की महाआघाडीला जनतेचा कौल मिळणार याचा फैसला आज होईल. मात्र सगळ्यांचं लक्ष आहे ते नितीश कुमार यांच्यावर कारण २००० ते २०२२ या प्रदीर्घ कालावधीत बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची एकाच माणसाला मिळाली आहे. त्या माणसाचं नाव आहे नितीश कुमार. आठवेळा बिहारचं मुख्यमंत्रिपद त्यांनी भुषवलं आहे. आता जर एनडीएचा विजय झाला तर नितीश कुमार नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. अशात मी कुठल्याही मार्गाने सत्ता मिळवेन हे नितीश कुमार कधी म्हणाले होते ते आम्ही तुम्हाला सांगतो आहोत.

१९७७ नंतर बिहारचं राजकारण ढवळून निघालं

१९७७ नंतर बिहारचं राजकारण ढवळून निघालं. कारण जनता पार्टीने पहिल्यांदाच त्यांचं बळ दाखवून दिलं होतं. काँग्रेसला आव्हान देत हा पक्ष मोठा झाला. पण नितीश कुमार हे त्या काळात निवडणूक हरले होते. त्या काळी पाटण्याच्या इंडिया कॉफी हाऊस सगळे राजकारणी, अभ्यास करणारे लोक जमायचे. लोकशाहीबाबत चर्चा व्हायच्या. नितीश कुमारही तिथे असत. पण त्यांची भूमिका ऐकणाऱ्याची जास्त होती. ते कमी बोलत असत. इंडिया कॉफी हाऊस हा त्यावेळी पाटणा येथील राजकीय चर्चांचं ठिकाण होतं.

नितीश कुमार आणि सुरेंद्र किशोर इंडिया कॉफी हाऊस मध्ये बसले होते

नितीश कुमार हे एक दिवस इंडिया कॉफी हाऊसमध्ये बसले होते. त्यांच्यासह पत्रकार सुरेंद्र किशोरही बसले होते. या दोघांची त्या काळात चांगली मैत्री होती. बिहारच्या राजकारणात काय चाललं आहे याची खडान् खडा माहिती सुरेंद्र किशोर यांना होती. त्यावेळी एका विषयावर चर्चा सुरु झाली की कर्पूरी ठाकूर यांनी मुख्यमंत्री होणं योग्य होतं की अयोग्य. याचं कारण असं होतं की १९७७ च्या काळात त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाले होते. कर्पूरी ठाकूर यांचं राजकारण मागासवर्गीयांभोवती केंद्रीत होतं. त्यामुळे तो वर्ग ठाकूर मुख्यमंत्री झाल्याच्या आनंदात होता. पण इतर घटकांची नाराजी होती. नितीश कुमार हे सगळी चर्चा ऐकत होते.

आणि नितीश कुमारांनी ते वाक्य उच्चारलं

सुरेंद्र किशोर म्हणाले की कर्पूरी ठाकूर सत्ता मिळवूनही खुश नाहीत. कारण त्यांना वाटतं आहे की जयप्रकाश नारायण आंदोलनाचा हेतू साध्य करण्यात कमी पडत आहेत. ही सगळी चर्चा सुरु असतानाच नितीश कुमार यांनी इंडिया कॉफी हाऊसमध्ये एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या मनात प्रचंड चीड होती. त्यांनी चर्चा सुरु असतानाच एक हात टेबलवर जोरात आपटला आणि म्हणाले, मी एक दिवस सत्ता प्राप्त करणार. त्यासाठी मला साम-दाम-दंड-भेद यापैकी कुठलंही धोरण अवलंबावं लागलं तरीही चालेल. पण एक सांगतो की सत्ता मिळाल्यानंतर चांगलं काम करणार. हे सगळं जे नितीश कुमार एका रागात बोलले होते हे भविष्यात खरं होईल याची कल्पनाही कुणाला नव्हती. जनसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

सुशील मोदी यांनी काय सांगितलं?

१९७७ च्या काळात जर कुणाला हे सांगितलं असतं की २००० मध्ये नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होतील तर कुणाचा विश्वासही बसला नव्हता. नितीश कुमार यांच्याबाबत सुशील मोदी म्हणाले की विद्यार्थी दशेत असताना नितीश कुमार महाविद्यालयीन राजकारणात फारसा सहभाग घेत नसत. तेव्हा कुणालाही वाटलं नसतं की ते मुख्यमंत्री होतील.