Bihar Floor Test Updates : बिहारमध्ये आज महत्त्वाचा दिवस आहे. नितीश कुमार यांनी महागठबंधन सोडून एनडीएला साथ देत पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यामुळे बिहारमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. आज नितीश कुमार यांना बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. त्यामुळे, आजचा दिवस महत्त्वाचा मानला जातोय. दरम्यान, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा पोलिसांनी भेट दिली. तेजस्वी यादव यांनी आमदारांना बंदिस्त करून ठेवल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तेजस्वी यादव यांचं घर गाठलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजदचे आमदार चेतन आनंद यांचं अपहरण करण्यात आल्याची तक्रार पाटणा पोलिसांत करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून चेतन आनंद घरच्यांच्या संपर्कात नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी ही तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी तेजस्वी यादव यांच्या घरी धाड मारून याबाबत चौकशी केली. परंतु, या चौकशीत चेतन आनंद यांनी मी स्वखुशीने येथे आलो आहे असा जबाब दिला. त्यामुळे पोलिसांनी तिथून काढता पाय घेतला. चेतन आनंद हे बिहारमधील माजी खासदार असून नेते आनंद मोहन यांचे सुपूत्र आहेत.

या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, RJD ने X वर टीका केली की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी फ्लोर टेस्टमध्ये पराभवाच्या भीतीनें तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी पोलिसांना पाठवले. त्यांना निवासस्थानात घुसून आमदारांबाबत अनुचित घटना घडवायची होती. बिहारची जनता नितीश कुमार आणि पोलिसांची गैरकृत्ये पाहत आहेत. लक्षात ठेवा, घाबरून नतमस्तक होणाऱ्यांमध्ये आम्ही नाही. हा विचारधारेचा संघर्ष आहे आणि आम्ही तो लढू आणि जिंकू कारण बिहारमधील न्यायप्रेमी जनता या पोलीस दडपशाहीला विरोध करतील. जय बिहार! जय हिंद!”

आरजेडीच्या या आरोपावर भाजप नेते शाहनवाज हुसेन यांनी राजद आणि काँग्रेसवर संभ्रम पसरवल्याचा आरोप केला आणि एनडीए सरकार विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करेल असा विश्वास व्यक्त केला. “तुम्ही (तेजस्वी यादव) आमदारांचे अपहरण केले आणि कोणत्याही आमदाराच्या नातेवाईकाने तक्रार दाखल केली, तर पोलिस नक्कीच येतील. तुम्ही (तेजस्वी यादव) कोणत्याही आमदाराला तुमच्या घरात बांधून ठेवले तर पोलिस नक्कीच कारवाई करतील. त्यामुळे ते पोलीस त्यांचे काम करत आहेत. आरजेडी आणि काँग्रेस फक्त गोंधळ घालत आहेत”, असं शाहनवाज हुसेन म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar floor test complaint of missing mla police raid at tejashwi yadavs house at midnight what exactly is going on in bihar sgk
First published on: 12-02-2024 at 08:11 IST