पाटणा : ‘इंडिया’ आघाडीने मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना मतदारांना सरकारी नोकऱ्या, मोफत वीज, जुनी पेन्शन योजना अशी विविध आश्वासने दिली. बिहार का तेजस्वी प्रण या नावाने हा ३२ पानी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला त्यावेळी ‘इंडिया’चे मुख्यमंत्रीपदाचे उमदेवार तेजस्वी यादव यांच्यासह घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.
‘इंडिया’च्या जाहीरनाम्यामध्ये २५ महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असून, त्यामध्ये राज्यातील समस्यांवर व्यावहारिक उपाय सुचवण्यात आले आहेत, असा दावा ३५ वर्षीय तेजस्वी यांनी केला. प्रत्येकी घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे आणि २०० युनिटपर्यंत मोफत वीज या आश्वासनांचा तेजस्वी प्रणमध्ये समावेश आहे.
‘इंडिया’ आघाडी सत्तेवर आल्यावर २० दिवसांच्या आत सरकारी नोकरीसंबंधी रोजगार हमीचा कायदा केला जाईल आणि २० महिन्यांच्या आत संपूर्ण राज्यात ही योजना लागू केली जाईल असे असे तेजस्वी यादव या महत्त्वाकांक्षी आश्वासनाबद्दल माहिती देताना म्हणाले. राज्यात दारुबंदीचा कायदा सपशेल अपयशी ठरला असून, आम्ही तो रद्द करू, असेही तेजस्वी यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या सर्व विभागातील कंत्राटी कामगारांना कायम केले जाईल, जीविका दिदींनाही नोकरीत कायम केले जाईल आणि त्यांना दरमहा ३० हजार रुपये वेतन दिले जाईल, असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. त्याशिवाय आयटी पार्क, एसईझेड, दुग्ध आणि कृषी आधारित उद्योग, एज्युकेशन सिटी आणि पाच नवे द्रुतगती मार्ग उभारले जातील, असे ‘इंडिया’कडून सांगण्यात आले.
बिहारी जनतेला गुन्हेमुक्त आणि घोटाळेमुक्त सरकार हवे आहे. ते निवडणुकत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) धडा शिकवतील, असे तेजस्वी म्हणाले. लोकांना पढाई (शिक्षण), दवाई (आरोग्य सुविधा), कमाई (रोजगार) आणि सिचाई (सिंचन) देणारे सरकार हवे आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
रालोआकडे बिहारसाठी कोणताही दृष्टिकोन नाही, त्यांनी अद्याप जाहीरनामादेखील प्रसिद्ध केला नाही. भाजप नेते आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे रुपांतर तालावर नाचणाऱ्या बाहुलीत केले आहे. भाजप नितीशकुमार यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेत आहेत. नितीशकुमार हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नाहीत, असे अमित शहा यांनी आधीच स्पष्ट केले आहे. – तेजस्वी यादव, नेते, राजद
घटक पक्षांनाही प्रतिनिधित्व
यापूर्वी २३ ऑक्टोबरला झालेल्या ‘इंडिया’च्या पत्रकार परिषदेत केवळ तेजस्वी यादव यांचे छायाचित्र असलेला फलक लावल्यामुळे वाद निर्माण झाला होता. मात्र, मंगळवारी जाहीरनामा प्रसिद्ध होताना ‘इंडिया’चे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. त्यामध्ये काँग्रेस नेते पवन खेरा, भाकप (माले) पक्षाचे सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य, व्हीआयपीचे अध्यक्ष मुकेश साहनी आणि ‘इंडिया’च्या अन्य नेत्यांचा समावेश होता. काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारपासून बिहारमधील प्रचारात सहभागी होणार आहेत.
