नवी दिल्ली : पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या पत्रांवरून भाजपने गांधी कुटुंबाला लक्ष्य करून सोमवारी नवा वाद निर्माण केला. २००८ मध्ये सोनिया गांधींनी ताब्यात घेतलेली नेहरूंची काही पत्रे पंतप्रधान संग्रहालयाला (पीएमएमएल) परत करावीत, अशी मागणी लोकसभेत सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासाला भाजपचे संबित पात्रा यांनी केली. त्यावर, या मागणीची नोंद घेण्यात आली असून यासंदर्भात योग्य कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण केंद्रीय सांस्कृतिकमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रिटिश भारताचे अखेरचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांची पत्नी एडविना माउंटबॅटन, अल्बर्ट आइनस्टाइन, बाबू जगजीवनराम, जयप्रकाश नारायण, पद्माजा नायडू, विजया लक्ष्मी, अरुणा असफ अली, गोविंद वल्लभ पंत आदी मान्यवरांना पं. नेहरूंनी खासगी पत्रे लिहिली होती. अशी अनेक पत्रे २००८ मध्ये ५१ गोणींमध्ये भरून तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधींना पाठवली होती. ही पत्रे नेहरू स्मारक संग्रहालय व ग्रंथालयाला (एनएमएमएल) परत करावीत, अशी विनंती अहमदाबादमधील इतिहासकार व ‘पीएमएमएल’ चे सदस्य रिझवान कादरी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केली आहे.

हेही वाचा >>>Priyanka Gandhi : संसदेत ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली बॅग घेऊन पोहचल्या प्रियांका गांधी; भाजपाच्या तुष्टीकरणाच्या आरोपाला दिलं सडेतोड उत्तर

ही पत्रे सोनिया गांधींच्या ताब्यात असून ‘एनएमएमएल’ ला म्हणजे आत्ताच्या पंतप्रधान संग्रहालयाला (पीएमएमएल) परत करण्यासाठी मदत करावी असे पत्र रिझवी यांनी राहुल गांधींना लिहिले आहे. रिझवी यांनी सप्टेंबरमध्ये सोनिया गांधींनाही पत्र लिहिले होते, असा दावा पात्रा यांनी केला. नेहरूंच्या पत्रांसंदर्भात लोकसभेत पहिल्यांदाच अधिकृतपणे मागणी करण्यात आली. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या आत्मचरित्राचा संदर्भ देत पात्रा यांनी नेहरूंवर असलेल्या लॉर्ड माउंटबॅटन व एडविना माउंटबॅटन यांच्या प्रभावाचा उल्लेख केला. नेहरूंनी एडविना यांना पत्र लिहिल्याच्या मुद्द्यावर पात्रा यांनी विशेष भर दिला. ही पत्रे सोनिया गांधी यांना गोपनीय ठेवायची असल्याचा आरोप पात्रा यांनी केला.

हेही वाचा >>>Indore Beggars : भीक देताय सावधान! ‘या’ शहरात भिकाऱ्यांना पैसे दिल्यास दाखल होणार गुन्हे

नेहरूंची ही पत्रे गांधी कुटुंबाची खासगी मालमत्ता नाही. या पत्रांमध्ये असे काय आहे की, गांधी कुटुंबाने ही पत्रे ताब्यात घेतली आहेत आणि ती ८० वर्षांनंतरही प्रसिद्ध होऊ नये असे त्यांना वाटते? इतिहासाच्या अभ्यासकांना संशोधनासाठी ही पत्रे उपयुक्त ठरू शकतील, असा दावा पात्रा यांनी सोमवारी भाजपच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

इतिहास जाणून घेण्यासाठी महत्त्वाचे…

●देशाचा इतिहास जाणून घेण्यासाठी नेहरूंची ही पत्रे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने चौकशी करावी, अशी मागणीही पात्रा यांनी लोकसभेत केली.

●१९७१ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७१ मध्ये नेहरूंचा वैयक्तिक पत्रव्यवहारांचा संग्रह सुरक्षितपणे जतन करण्यासाठी नेहरू संग्रहालयाला दिला होता. हीच पत्रे सोनिया गांधींनी ताब्यात घेतली आहेत, असे रिझवी यांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp creates new controversy by targeting gandhi family over pandit nehru letters amy