मागच्या दहा वर्षांत देशाने गतीने प्रगती केली आहे. हे एकटा मी म्हणत नाही तर सगळं जग गाजावाजा करुन ही बाब सांगते आहे. प्रत्येक क्षेत्रात भारताच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. एक मोठा संकल्प आणि प्रत्येक भारतीय जोडला गेला आहे. त्यामुळे आपला देश छोटी स्वप्न पाहू शकत नाही आणि संकल्पही छोटे करु शकत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्याला भारत विकसित देश करायचा आहे हे आपलं स्वप्न आहे. यासाठी पुढच्या पाच वर्षांची खूप मोठी भूमिका असणार आहे. पुढच्या पाच वर्षांत आपल्या विकसित भारतासाठी एक प्रचंड हनुमान उडी घ्यायची आहे. आपल्याला जर अशी हनुमान उडी घ्यायची असेल तर सरकारमध्ये भाजपा परत येणं आवश्यक आहे हे विसरु नका असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज विरोधी पक्षातले नेतेही एनडीएचा चारशे पारचा नारा देत आहेत

आज विरोधी पक्षातले नेतेही एनडीए सरकार चारशे पार चे नारे देत आहेत. हे लक्ष्य गाठायाचं असेल तर भाजपाला ३७० जागा जिंकाव्याच लागतील. अनेकदा लोक मला सांगतात तुम्ही इतकं सगळं केलंत आता कशाला धावपळ करता? त्यावर मी सांगतो दहा वर्षात निष्कलंक कार्यकाळ आपण दिला आहे. २५ कोटी लोकांना आम्ही गरिबीतून बाहेर काढलं आहे. आपण आपल्या देशाल्या महाघोटाळ्यांमधून आणि दहशतवादी हल्यांमधून मुक्ती दिली आहे. आपण गरीब आणि मध्यमवर्गीयांचं आयुष्य यांचा स्तर उंचावून दाखवला आहे. जे म्हणतात हे सगळं खूप झालं त्यांना एक घटना सांगतो.

मोदींनी सांगितला तो किस्सा

एकदा एक बडे नेते मला भेटले. मला म्हणाले तुम्ही पंतप्रधान झालात ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही मुख्यमंत्रीही बराच काळ होतात, दुसऱ्यांदा पंतप्रधान झाला. आता तर थोडा आराम करा. असं मला एक बडे नेते म्हणाले होते. त्यांची ती भावना राजकीय अनुभवांतून आली होती. पण आपण राजकारण करत नाही आपण राष्ट्राची सेवा करतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. छत्रपती शिवराय हे छत्रपती झाले म्हणून त्यांनी आराम केला नाही. त्यांचं त्यांचं राज्य वाढवलं. त्यांचीच प्रेरणा घेऊन मी देखील हेच सांगतो आहे की मी देखील शांत बसणार नाही. राष्ट्राला विकसित राष्ट्र करायचं आहे हा माझा संकल्प आहे. जर मी माझ्या घराची काळजी करत बसलो असतो तर कोट्यवधी लोकांसाठी घरं बांधता आली नसती असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे! शिवसेनेच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे आवाहन

आपला संकल्पही मोठाच आहे हे विसरु नका

देशातल्या कोट्यवधी युवकांचं, तरुण तरुणींची स्वप्नं हाच माझा संकल्प आहे. आपण सगळे सेवाभावातून दिवसरात्र एक करुन काम करत आहोत. मागच्या दहा वर्षांत जे आपण केलं ते एखाद्या टप्प्याप्रमाणे आहे. आता आपल्याला देशासाठी मोठं लक्ष्य गाठायचं आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाचं आयुष्य बदलण्यासाठी आपल्याकडे नवे संकल्प आहेत. त्यासाठी अनेक निर्णय घेणं बाकी आहे त्यामुळे मी तिसरी टर्म मागतो आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे.

आपण जुनाट व्यवस्था मूळापासून बदलल्या

आधी लोकांना वाटायचं सरकार बदलतं, व्यवस्था बदलत नाही. मात्र आपण जुन्या विचारसरणीतल्या व्यवस्था आपण बाहेर काढल्या. ज्यांना कुणी विचारत नव्हतं त्यांची आपण पूजा केली आहे हे कुणी विसरु नका. आदिवासी समाजातल्या सर्वात मागास समाजाला कुणी विचारतही नव्हतं त्यांच्यासाठी आपण योजना तयार केली. फूटपाथ, गाड्यांवर काम करणाऱ्या लोकांचा विचार कुणी केला नव्हता त्यांच्यासाठी आपण पीएम स्वनिधी योजना तयार केली. आपल्याकडे मुलींना गर्भात मारुन टाकलं जाण्याची कुप्रथा होती. त्याविरोधात समाजजागृती आणि कायद्याचा आधार घेतला. बेटी बचाओ बेटी पढाओ ही मोहीम आपण मोठ्या प्रमाणावर चालवली हे विसरता येणार नाही असंही मोदी यांनी भाषणात म्हटलं आहे. भाजपाच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं आणि विरोधकांवर टीका केली तसंच भाजपाच्या योजनाही सांगितल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp wants to come to power for the third time because said pm narendra modi scj
First published on: 18-02-2024 at 14:41 IST