पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यात देशाला हादरवणारी घटना घडली आहे. येथील खार तालुक्यात एका राजकीय पक्षाच्या मेळाव्यात बॉम्बस्फोट घडवला आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यासह २० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी जमियत उलेमा इस्लाम-फझल (JUI-F) या राजकीय पक्षाच्या मेळाव्यात हा बॉम्बस्फोट घडला. बाजौर जिल्हा आपत्कालीन अधिकारी साद खान यांनी मृतांची आणि जखमींच्या संख्येची पुष्टी केली आहे.

खान यांनी सांगितलं की, खारमधील स्फोटात जेयूआय-एफचे प्रमुख नेते मौलाना झियाउल्लाह जान यांचाही स्फोटात मृत्यू झाला आहे. जखमींना पेशावर आणि टीमरगेरा येथील रुग्णालयात हलवलं जात आहे. जखमींमध्ये स्थानिक पत्रकाराचाही समावेश असल्याची माहिती समजत आहे.

या स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आहे. जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी काही रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर पोलिसांनी परिसराला वेढा दिला आहे. या घटनेनंतर पाकिस्तानाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. JUI-F च्या कार्यकर्त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचून रक्तदान करावं, असं आवाहन पक्षाच्या नेत्यांकडून केलं जात आहे.