पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका राजकीय पक्षाच्या मेळाव्यात आत्मघाती बॉम्बरने स्फोट घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटात २० लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. आता हा आकडा वाढला असून यामध्ये ३९ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २०० हून अधिक लोक जखमी झाल्याचं वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’ने दिलं आहे.
बाजौर जिल्ह्यातील खार येथे रविवारी जमियत उलेमा इस्लाम-फजल (JUI-F) या राजकीय पक्षाचा मेळावा सुरू होता. दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास हा स्फोट झाला. या घटनेनंतर पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. अद्याप कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. जखमींपैकी बहुतांश जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा- मोठी बातमी: पाकिस्तानमध्ये राजकीय पक्षाच्या मेळाव्यात बॉम्बस्फोट; प्रमुख नेत्यासह २० ठार, ५० जखमी
खारमधील स्फोटात JUI-F चे प्रमुख नेते मौलाना झियाउल्लाह जान यांचाही मृत्यू झाला. बाजौर जिल्हा आपत्कालीन अधिकारी साद खान यांनी याबाबतची पुष्टी केली. जखमींना पेशावर आणि टीमरगेरा येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत आहे, अशी माहितीही साद खान यांनी ‘द डॉन’ला दिली. या स्फोटाचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
JUI-F चे प्रमुख मौलाना फजलूर रहमान यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि खैबर पख्तूनख्वा प्रांताचे काळजीवाहू मुख्यमंत्री आझम खान यांच्याकडे या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच कार्यकर्त्यांनी रुग्णालयात जाऊन रक्तदान करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
