वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
अमेरिकेचे व्यापारी सल्लागार पीटर नव्हारो यांनी पुन्हा भारताविरोधात गरळ ओकली असून, या वेळी त्यांनी जातीवाचक विधान केले. “रशियाकडून तेलखरेदीत भारतीय जनतेच्या जीवावर ब्राह्मण लोक अधिक फायदा कमावत आहेत” असे उद्गार त्यांनी काढले. तसेच, भारत हा रशियासाठी पैसे कमावणारे धुलाई यंत्र असल्याचा पुनरुच्चार केला.

‘फॉक्स न्यूज’ला सोमवारी दिलेल्या मुलाखतीत नव्हारो यांनी भारतावर टीका केली. व्यापार आणि भूराजकीय आघाड्या अमेरिकेच्या हिताविरोधात अस्थिर करण्याचा आरोप त्यांनी भारतावर केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनावर टीका केली. चीन आणि रशियाबरोबरील भारताच्या संबंधांमुळे ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही’ हा दर्जा दुय्यम होतो, असे ते म्हणाले. याखेरीज, भारत हा ‘करांचा महाराजा’ असल्याचा उल्लेख त्यांनी करून ५० टक्के कर लावल्याचे समर्थन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यामध्ये शांघाय सहकार्य संघटनेमध्ये झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर नव्हारो यांनी टीका केली. या संघटनेच्या बैठीकीनिमित्त मोदी यांनी पुतिन यांचीही भेट घेऊन दीर्घ काळ चर्चा केली.

मी भारतीय जनतेला सांगू इच्छितो, की काय चालले आहे, ते समजून घ्या. भारतीय जनतेच्या जिवावर ब्राह्मण लोक फायदा घेत आहेत. आपल्याला हे थांबवायला हवे. – पीटर नव्हारो, अमेरिकेचे व्यापारी सल्लागार

‘भारत हा नियमांवर चालणारा देश’

नवी दिल्ली : अमेरिकेचे व्यापार सल्लागार पीटर नव्हारो यांनी भारतावर केलेल्या टीकेचे तेलमंत्री हरदीप पुरी यांनी नाव न घेता खंडन केले. भारत नियमांवर चालणारा देश असून, रशियाच्या तेलखरेदीतून कुठलाही नफा होत नसल्याचे विधान त्यांनी केले. ते म्हणाले, ‘रशियातून करण्यात येणाऱ्या तेलखरेदीतून भारताने कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. तसेच, युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारताने रशियातून तेलखरेदी केल्यामुळे जागतिक बाजार स्थिर राहण्यास आणि किमतींवर नियंत्रण राहण्यास मदत झाली.’ एका इंग्रजी वृत्तपत्रात त्यांनी लेख लिहून पुरी यांनी अमेरिकेचे दावे फेटाळून लावले.