नवी दिल्ली : दिल्लीतील सात जागांसाठी शनिवारी, २५ मे रोजी मतदान होणार असून प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आम आदमी पक्ष व भाजपने राष्ट्रीय मुद्द्यांसह स्थानिक मुद्द्यांवर भर दिला आहे. दिल्लीकरांच्या सवलती भाजपकडून काढून घेतल्या जातील अशी भीती ‘आप’कडून दाखवली जात आहे तर, दिल्ली शहरातील विकास हा भाजपच्या प्रचारातील प्रमुख मुद्दा ठरला आहे.

‘मी तुमच्या मुलांसाठी सरकारी शाळांचा दर्जा सुधारल्या. पंतप्रधान मोदींना या शाळा बंद करायच्या आहेत. मी दिल्लीत ५०० शाळा बांधल्या आहेत. मला तुरुंगात पाठवून मी दिल्लीसाठी करत असलेले काम थांबवायचे आहे’, असा प्रचार करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, पंतप्रधान नरेद्र मोदींनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे दिल्ली आधुनिक महानगर बनल्याचा दावा केला आहे. भारत मंडपम आणि यशोभूमी सारख्या आधुनिक अधिवेशन केंद्रांसह संसदेची नवीन इमारत, राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि आंबेडकर स्मारक यांसारख्या स्मारक बांधली गेली. दररोज संध्याकाळी शांत कर्तव्य मार्गावर कुटुंबे जमतात, हे आमच्या प्रयत्नांचे फळ आहे, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा >>>गृह मंत्रालयाच्या कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी

भाजपने मद्याविक्री घोटाळा व या प्रकरणामध्ये केजरीवाल, सिसोदिया आदी ‘आप’च्या नेत्यांना झालेली अटक, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सांडपाण्याचा प्रश्न, झोपडपट्टीतील सुविधा अशा स्थानिक मुद्द्यांवरून ‘आप’ला धारेवर धरले आहे. तर, ‘आप’ने शाळा, आरोग्य सुविधा, महिलांना दरमहा भत्ता, मोफत बसप्रवास या सुविधांचा प्रचारावर भर दिला आहे. झोपडपट्टी तसेच, निम्न आर्थिक गटांतील रहिवासी हे ‘आप’चे प्रमुख मतदार असून या वस्त्यांमधील दलित व मुस्लिम मतदारांवर ‘इंडिया’ आघाडीने लक्ष केंद्रीत केले आहे.

तीन मतदारसंघात तगडी लढत?

२०१९ मध्ये भाजपला सरासरी ५६ टक्के मते मिळाली होती. आप व काँग्रेसची एकत्रित मतांची सरकारी टक्केवारी ४० टक्के आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीला भाजपचा पराभूत करायचा असेल तर सुमारे १४ टक्के मताधिक्य कमी करावे लागेल. भाजप व ‘इंडिया’ यांच्यातील मतांतील कमीत कमी फरक पश्चिम दिल्ली (५.२६ टक्के), चांदनी चौक (८.५३ टक्के) व उत्तर-पूर्व (११.९९ टक्के) या तीन मतदारसंघांमध्ये असल्याने या जागांवर चुरस निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>>पश्चिम बंगालमध्ये २०१० नंतरची सर्व ओबीसी प्रमाणपत्रे रद्द; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय मुद्द्यांसह स्थानिक मुद्द्यांवरही भर दिला आहे.

२०१९ मधील मतदारसंघनिहाय मतांची टक्केवारी : ● चांदनी चौक- भाजप- ५२.९४, काँग्रेस- २९.६७, आप- १४.७४. (भाजप-‘इंडिया’तील अंतर- ८.५३) ● उत्तर-पूर्व- भाजप- ५३.९०, काँग्रेस- २८.८५, आप- १३.०६. (भाजप-‘इंडिया’तील अंतर- ११.९९) ● पूर्व दिल्ली- भाजप- ५५.३५, काँग्रेस- २४.२४, आप- १७.४४. (भाजप-‘इंडिया’तील अंतर- १३.६७) ● नवी दिल्ली- भाजप- ५४.७७, काँग्रेस- २६.९१, आप- १३.६६. (भाजप-‘इंडिया’तील अंतर- १४.२०) ● उत्तर-पश्चिम- भाजप- ६०.४८, काँग्रेस-१६.८८, आप- २१.०१. (भाजप-‘इंडिया’तील अंतर- २२.५९) ● पश्चिम दिल्ली- भाजप- ४८.३०, काँग्रेस- १४.६६, आप- २८.३८. (भाजप-‘इंडिया’तील अंतर- ५.२६) ● दक्षिण दिल्ली- भाजप- ५६.५८, काँग्रेस- १३.५६, आप- २६.३५. (भाजप-‘इंडिया’तील अंतर- १६.६७)

पक्षनिहाय मतांची सरासरी टक्केवारी : ● भाजप: ५६.८५ ● काँग्रेस: २२.६३ ● आप: १८.२० ● काँग्रेस व आप (इंडिया)-४०.८३ ● भाजप व इंडिया अंतर- १६.०२

‘मालीवाल’ प्रकरणाचा ‘आप’ला फटका?

‘आप’ व भाजपने महिला मतदारांवर लक्ष केंद्रीत केले असून स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणामुळे भाजपला ‘आप’विरोधात कोलित मिळाले आहे. भाजपच्या राष्ट्रीय तसेच, प्रदेशनेत्यांनी आप नेत्या मलिवाल यांना झालेल्या मारहाणीला केजरीवाल यांना जबाबदार धरले असून त्यांच्याविरोधात झोपडपट्ट्यांमधील ‘आप’च्या महिला मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘आप’च्या विजयामध्ये महिला मतदारांचा मोठा वाटा असून मालिवाल प्रकरणामुळे ‘आप’ला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केजरीवालांनी आक्रमक भूमिका घेत भाजपच्या दिल्लीतील मुख्यायलयावर मोर्चा नेला होता. आपविरोधात भाजपचे कटकारस्थान असल्याचा आरोप केजरीवाल यांनी प्रचारसभांमध्ये केला आहे.

‘आप’काँग्रेससाठी फक्त केजरीवाल

दिल्लीतील प्रचार गुरुवारी संपत असून भाजपने नेहमीप्रमाणे राजधानीमध्ये नेत्यांची फौज उतरवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दोन प्रचारसभा-रोड शो झाले आहेत. या शिवाय, अमित शहा, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, शिवराजसिंह चौहान यांच्याही सभा झालेल्या आहेत. या तुलनेत ‘इंडिया’ आघाडीसाठी प्रामुख्याने अरविंद केजरीवाल प्रचारसभा-रोड शो घेत आहेत. काँग्रेसच्या तीन उमेदवारांसाठी देखील केजरीवाल व आपचे नेते प्रचार करत आहेत. काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याची प्रचारसभा झाली नसून गुरुवारी, प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राहुल गांधींच्या प्रचार सभा होणार आहेत.