Delhi Red Fort Car Blast News: दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. राजधानी दिल्लीतील अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानकाच्या गेट क्र. १ जवळ उभ्या असलेल्या गाडीचा स्फोट झाला. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. याबद्दल दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी माहिती दिली.
स्फोट झाल्यानंतर घटनास्थळावरून जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर पोलीस आुयक्त सतीश गोलचा यांनी माध्यमांशी संवाद साधत घटनेची प्राथमिक माहिती दिली.
सतीश गोलचा यांनी सांगितले की, आज सायंकाळी ६.५२ वाजता लाल किल्ल्याजवळून संथ गतीने जाणाऱ्या वाहनात स्फोट झाला. वाहनात त्यावेळी काही प्रवासी होते. या स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांचेही नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, एफएसएल, एनआयए, एनएसजी आणि इतर यंत्रणा तात्काळ घटनास्थळी आल्या. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत.
“या घटनेचा तपास केल्यानंतर स्फोटाचे कारण काय आहे, हे सांगू. तसेच स्फोटात काही जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. नेमका आकडा काही वेळातच जाहीर केला जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोनवरून घटनेची माहिती दिली आहे. ते फोनवरून वेळोवेळी माहिती घेत आहेत”, अशी माहिती पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी दिली.
लाल किल्ल्याजवळ काय घडले?
सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी जुन्या दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाबाहेरील गेट क्र. १ जवळ वाहनाचा स्फोट झाला. यामुळे अनेक वाहनांना आग लागली.
स्फोट नेमका कुठे घडला?
अधिकाऱ्यांनी स्फोटाचे ठिकाण लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्र. १ च्या बाहेर असल्याचे सांगितले. दिल्ली गेट ते काश्मिरी गेटला जोडणाऱ्या रस्त्यावर हा स्फोट झाला. ही परिसर चांदणी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूस आहे. तर जामा मशिदीपासून केवळ दीड किमी अतंरावर आहे.
स्फोट कधी झाला?
जुन्या दिल्लीतील दाट लोकवस्ती असलेल्या भागात हा स्फोट घडला. एक संथ गतीने येणाऱ्या गाडीने रेड सिग्नल दिल्यावर ६ वाजून ५२ मिनिटांनी स्फोट घडला. गाडीत जवळपास दोन ते तीन लोक बसले होते, अशी माहिती दिल्ली पोलीस आयुक्तांनी दिली.
दिल्ली मेट्रो सेवेवर काय परिणाम झाला?
दिल्ली पोलिसांनी लाल किल्ला स्थानकावरील गेट क्रमांक १ आणि ४ वरील रहदारी बंद केली आहे.
