नवी दिल्ली : बिहारमधील विधानसभा निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी घोषणा केली. पंधरा वर्षांनंतर बिहारमध्ये दोन टप्प्यांत, ६ व ११ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बिहारच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच मतदारांच्या फेरतपासणी मोहिमेमुळे (एसआयआर) ही निवडणूक वादग्रस्त झाली असली तरी, बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदार याद्यांचे मोठ्या कष्टाने शुद्धीकरण करण्यात आले आहे. ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांचे कौतुक केले पाहिजे, असे ज्ञानेश कुमार म्हणाले. इतकेच नव्हे तर, बिहारमध्ये कित्येक वर्षांतील सर्वात पारदर्शक निवडणूक होईल, असा दावाही केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनी केला. मतदानाच्या टक्केवारीवरून वाद निर्माण केला गेला होता. यासंदर्भातील भ्रमही दूर करण्यात आला आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर मतदान संपल्यानंतर मतदानयंत्रांमध्ये झालेल्या मतदानाचा आकडा अर्ज क्रमांक ‘१७-क’मध्ये भरला जातो व हा अर्ज प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक प्रतिनिधींना दिला जातो. त्यामुळे या प्रतिनिधींनी मतदान केंद्रातून बाहेर पडण्याआधी हा अर्ज ताब्यात घेतला पाहिजे, असे आवाहन ज्ञानेश कुमार यांनी केले.
२०२० मध्ये बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक झाली होती. त्याही आधी पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. या वेळी मात्र, राजकीय पक्षांनी एकाच टप्प्यामध्ये मतदान घेण्याची विनंती केली होती. दिवाळीनंतर लगेचच छटपूजेचा उत्सव बिहारमध्ये साजरा होणार आहे. त्यानिमित्त परराज्यांतील बिहारी मतदार घरी परत येतात. त्यामुळे छटपूजेच्या आसपास मतदान करण्याची राजकीय पक्षांची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केलेली नाही. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी किमान कालावधी देणे गरजेचे असते, असा युक्तिवाद ज्ञानेश कुमार यांनी केला.
६८.५ लाख वगळले, २१.५३ लाख समाविष्ट
मतदारांच्या फेरआढाव्याच्या मोहिमेची (एसआयआर) अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली असून ६८.५ लाख मतदारांना वगळण्यात आले आहे. तसेच, २१.५३ लाख नव्या मतदारांना समाविष्ट करण्यात आले आहे. मतदार याद्यांच्या ह्यशुद्धीकरणाह्णनंतर बिहारमध्ये ७ कोटी ४२ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने ह्यएसआयआरह्णची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्यावर मंगळवारी, ७ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. बिहारमध्ये एकूण ९० हजार ७१२ मतदार केंद्रे असून प्रत्येक मतदान केंद्रांवर १२०० मतदार मतदान करू शकतील. ही संख्या पाहता या वेळीही संध्याकाळी पाचनंतर म्हणजे मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदानासाठी मोठ्या रांगा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर घोटाळ्याचे आरोप केले होते.
मतदानाचे चित्रीकरण न देण्यावर ठाम
मतदानाच्या प्रक्रियेमध्ये कोणताही गोंधळ वा घोटाळा होऊ नये यासाठी प्रत्येक मतदार केंद्रावर मतदानाचे चित्रीकरण केले जाणार आहे. मात्र, हे चित्रीकरण राजकीय पक्षांना दिले जाणार नाही. मतदारांच्या वैयक्तिक खासगी हक्काच्या संरक्षणासाठी हे चित्रीकरण सार्वजनिक करता येणार नाही, असे ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले. मतदानाचे चित्रीकरण फक्त न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायालयालाच दिले जाऊ शकते. याविरोधात महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केले, असे आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले.
देशभर ‘एसआयआर’
बिहारप्रमाणे देशभर मतदारांच्या फेरआढाव्याची मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या राज्यवार तारखा निश्चित केल्या जाणार आहेत. मात्र, त्यासंदर्भात सर्व राज्य निवडणूक अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी दिली. बिहारनंतर पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने याच राज्यांत प्राधान्यांनी ह्यएसआयआरह्ण राबवले जाईल.
घुसखोरांबाबतच्या प्रश्नाला बगल
बिहारमधील ‘एसआयआर’च्या ‘शुद्धीकरणा’मागे देशात अवैधरीत्या आलेल्या लोकांना शोधण्याचाही प्रमुख उद्देश होता. ‘एसआयआर’मध्ये मृत मतदार, एकाच वेळी अनेक मतदारसंघांमध्ये नाव असलेले, स्थलांतर केलेले तसेच भारताचे नागरिक नसलेले अशा अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले. मात्र, बिहारमध्ये घुसखोरीचा आकडा किती, या पत्रकारांनी वारंवार विचारलेल्या प्रश्नाला ज्ञानेश कुमार यांनी बगल दिली. यासंदर्भातील आकडेवारीचे राज्यातील निवडणूक नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे विकेंद्रीकरण झाले असल्याचे संदिग्ध प्रत्युत्तर ज्ञानेश कुमार यांनी दिले. त्यामुळे बिहारमध्ये घुसखोर नेमके किती हा वादग्रस्त मुद्दा गुलदस्त्यात राहिल्याचे स्पष्ट झाले.
२४३
एकूण जागा
पहिला टप्पा
पश्चिम व मध्य बिहारचा पहिला टप्पा (१२१ जागा)
७ राज्यांमध्ये पोटनिवडणूक
जम्मू-काश्मीरमधील बडगाम व नागरोटा, राजस्थानमधील अन्ता, झारखंडमधील घाटशिला, तेलंगणातील जुबली हिल, पंजाबमध्ये तरनतारन, मिझोराममधील डाम्पा, ओडिशामधील नौपाडा अशा ८ विधानसभा मतदारसंघांमध्येही पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. ११ नोव्हेंबर रोजी मतदान तर, मतमोजणीही १४ नोव्हेंबरला होणार आहे.
दुसरा टप्पा
उत्तर, पूर्व व दक्षिण बिहारचा दुसरा टप्पा (१२२ जागा) अशा दोन टप्प्यांत मतदान.
एनडीए : भाजप-७४, जनता दल (सं)- ४३, हिंदुस्तानी अवाम मोर्चा व व्हीआयपी या पक्षांना प्रत्येकी ४
महाआघाडी : राष्ट्रीय जनता दल-७५, काँग्रेस-१९, माकप-मालेसह डावे पक्ष-१६ (२०२० चे बलाबल)