Baba Swami Chaitanyananda Case : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वती हा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. चैतन्यानंदने १७ विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असून चैतन्यानंदला पोलिसांनी बेड्याही ठोकल्या आहेत. मात्र, या चैतन्यानंदचे अनेक धक्कादायक कारनामे आता समोर आले आहेत. सेक्स टॉय, पॉर्न सीडी ते मोबाईलमध्ये महिलांना पाठवलेले अश्लील मेसेज अशा अनेक गोष्टी चैतन्यानंदच्या समोर आल्या आहेत.

चैतन्यानंदला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर न्यायालयाने आधी पाच दिवसांची कोठडी सुनावली होती. या दरम्यान, पोलिसांनी चैतन्यानंदची कसून चौकशी केली. या चौकशी दरम्यान अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. यामध्ये चैतन्यानंदच्या खोलीत सेक्स टॉय आढळून आला, तसेच त्याच्या फोनमध्ये अश्लील चॅट्सही आढळून आले आहेत. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

सेक्स टॉय, पॉर्न सीडी, बनावट फोटो…

तपासकर्त्यांनी या प्रकरणातील चैतन्यनंद सरस्वती राहत असलेल्या खोलीतील वस्तूंची तपासणी केली तेव्हा त्यांना जे काही आढळून आलं ते पाहून धक्काच बसला. यामध्ये एक सेक्स टॉय, अश्लील सामग्री असलेले सीडी आणि तीन बनावट फोटो. पोलिसांनी सांगितलं की या बनावट फोटोमध्ये चैतन्यनंद सरस्वती हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, बराक ओबामा आणि डेव्हिड कॅमेरॉन यांच्याबरोबर दिसत होता. तसेच चैतन्यानंदवर २०२५ मध्ये तीन गुन्हे दाखल असून छेडछाड, फसवणुकीसह आदी काही गुन्हे दाखल आहेत.

महिलांना नोकरीचं आश्वासन द्यायचा

स्वामी चैतन्यानंद हा गरीब पार्श्वभूमी असलेल्या महिलांना लक्ष्य करायचा आणि त्यांना नोकरीचं खोटं आश्वासन द्यायचा. पोलिसांनी असंही उघड केलं की स्वामी चैतन्यनंद सरस्वती हा सहसा परिस्थितीने गरीब असलेल्या महिलांना तो टार्गेट करायचा आणि तो त्यांच्याकडे वेगवेगळी मागणी करायचा आणि त्यांना ‘बेबी, आय लव्ह यू’ अशा प्रकारचे मेसेज पाठवत असायचा.

तसेच पोलिसांनी चैतन्यनंद सरस्वतीचा फोन आणि आयपॅडची तपासणी केल्यानंतर अश्लील टेक्स्ट मेसेज आणि महिला विद्यार्थ्यांचे गुप्तपणे फोटो आढळून आले आहेत. त्याच्याकडे एअर होस्टेस आणि फोटो आणि विद्यार्थ्यांच्या डिस्प्ले पिक्चर्सचे स्क्रीनशॉट देखील सेव्ह केलेले आढळून आले आहेत. एवढंच नाही तर एका कथित चॅटमध्ये तो दुबईच्या राजासाठी सेक्स पार्टनरची व्यवस्था करण्यास सांगत असल्याचंही उघड झालं आहे.

कोण आहेत चैतन्यानंद सरस्वती?

स्वामी चैतन्यानंद सरस्वती याचे खरे नाव डॉ. पार्थसारथी असून, तो मूळचा ओडिशातील रहिवासी आहेत. स्वत:ला धर्मगुरू म्हणणारा हा स्वयंघोषित बाबा १२ वर्षांपासून एक आश्रम चालवतो. दिल्लीतील वसंत कुंज परिसरात असलेल्या एका खासगी संस्थेचा तो संचालक असल्याची माहिती समोर आली आहे. चैतन्यानंद याचा भूतकाळ वादग्रस्त राहिलेला आहे. २००९ मध्ये त्याने दिल्लीतील एका महिलेचा विनयभंग केला होता. त्यावेळी पोलिसांनी चैतन्यानंद याला अटक करून त्याची तुरुंगात रवानगी केली होती. २०१६ मध्ये वसंत कुंज परिसरात एका महिलेने त्याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. तेव्हाही पोलिसांनी त्याला अटक केली होती.