Swami Chaitanyananda Arrest: दिल्लीतील एका स्वयंघोषित बाबाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी आश्रमातील अवैध प्रकार उघडकीस आणत गंभीर आरोप केले होते. येथील आश्रमाचा प्रमुख स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी नावाच्या महाराजावर विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोपाप्रकरणी स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपानंतर दिल्ली पोलिसांनी स्वामी चैतन्यानंद सरस्वतीला आग्रा येथून बेड्या ठोकल्या आहेत.

स्वामी चैतन्यानंद सरस्वतीवर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो पोलिसांना चकवा देत होता. स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार असताना पोलिसांना नेमकं कसा चकवा द्यायचा? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. स्वामी चैतन्यानंद सरस्वती हा नाव बदलून हॉटेलमध्ये राहायचा, तसेच त्याने तब्बल १३ हॉटेल्स बदलले. पण तरीही तो पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच. या संदर्भातील वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे.

दरम्यान, १७ मुलींना त्रास देण्याचा आरोप असलेला चैतन्यनंद सरस्वती अटक टाळण्यासाठी वेगवेळे प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. डीसीपी अमित गोयल यांनी म्हटलं की, “आरोपी अनेक दिवसांपासून फरार होता. तसेच पोलीस त्याला पकडू नये म्हणून तो मथुरा, वृंदावन आणि आग्रा असे अनेक ठिकाणे बदलत राहत होता, त्याने या काळात १३ हॉटेल्स बदलली.”

“आम्ही एक पथक तयार केलं होतं, गेल्या तीन दिवसांपासून आम्ही चैतन्यनंद सरस्वतीचा शोध घेण्यासाठी विविध राज्यांमध्ये हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि अगदी पश्चिम बंगालमध्ये शोध घेत होतो. काल रात्री आम्हाला आग्रा येथे त्याला पकडण्यात यश आलं. त्याची ओळख पटल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि दिल्लीला आणण्यात आले. पुढील तपास सुरू आहे”, असं डीसीपी अमित गोयल यांनी म्हटलं आहे.

३२ मुलींची लेखी तक्रार

पोलिसांनी सांगितलं “एकूण ३२ विद्यार्थिनींनी पार्थसारथीविरोधात तक्रार दाखल केली असून त्यापैकी १७ मुलींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या मुलींनी लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली आहे. चैत्यनानंद त्यांना अश्लील मेसेजेस पाठवत होता, त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलत होता, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता, असं या मुलींनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानुसार स्वामी चैतन्यनंद सरस्वतीविरोधात आम्ही गुन्हा दाखल केला.”

पार्थसारथीच्या कारवर UN ची नंबर प्लेट

दरम्यान, पोलिसांनी स्वामी चैतन्यनंद सरस्वतीची आलिशान कार जप्त केली आहे. या कारवर संयुक्त राष्ट्राची बनावट नंबर प्लेट लावण्यात आली आहे. पोलीस तपासात उघड झालं आहे की संयुक्त राष्ट्राकडून असा कोणताही नंबर जारी करण्यात आलेला नाही. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून सीसीटीव्ही फूटेज, इतर डिजीटल डिव्हाइसेस, एनव्हीआर व हार्ड डिस्क्स जप्त आहेत. हे सर्व पुरावे फॉरेन्सिक टीमकडे तपासणी करण्यासाठी पाठवले आहेत.