जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधींचा जन्म झाला ते घर स्मारक म्हणून जतन केले गेले आहे. बाजूलाच बांधलेल्या संग्रहालयात गांधींचे अहिंसेवरील साहित्य, त्यांची मते वाचायला मिळतात. श्रीकृष्णाला आवडीने पोहे घेऊन जाणाऱ्या सुदामाचे मंदिरही जवळच आहे, द्वारका येथून १२३ किलोमीटरवर. पोरबंदरचा किनाराही शुभ्रवर्णी वाळूचे सौंदर्य लाभलेला. जुन्या काळच्या आठवणी जपून ठेवलेला हा पोरबंदर परिसर ओळखला जातो तो चुनखडी आणि बॉक्साइटच्या खाणींसाठी, मासेउद्योगासाठी आणि गुन्हेगारीसाठीही.. गेल्या काही वर्षांत येथील गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे, असे येथील लोकांनी आवर्जून सांगितले. तरीही येथे अधूनमधून हरवल्याच्या तक्रारी दाखल होत असतात. जवळच असलेल्या चुन्याच्या खाणीमध्ये एखादा देह टाकला की दहा दिवसांत त्याची विल्हेवाट लागत असल्याने खुनापेक्षा हरवल्याच्या तक्रारी जास्त असतात, असे एका स्थानिकाने सांगितले. या मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ मंत्री बाबूभाई बोखिरिया व काँग्रेस नेते व माजी विरोधी पक्षनेते अर्जुन मोढवाडिया यांच्यात अटीतटीचा सामना आहे.
दीडच महिन्यापूर्वी येथील खाणमाफिया भीमा डुला ओडेदराला १३ वर्षांपूर्वीच्या दुहेरी खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. २००५ मध्ये काँग्रेस नेते मुलु मोढवाडिया यांच्या खुनासह ४४ गंभीर गुन्ह्य़ांची नोंद असलेल्या ओडेदराला पहिल्यांदाच एका खुनासाठी शिक्षा झाली. इस्माइल मुंद्रा आणि युसुफ इस्माइल यांना त्याने ठार मारल्याचे सिद्ध झाले. याच वर्षांच्या जानेवारीत इस्माइलचा मुलगा सलीम आणि सलीमचा मुलगा खालिद यांनी ओडेदरावर गोळीबार केला आणि हे सर्व प्रकरण पुन्हा चच्रेत आले. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे या ओडेदरांचा मुलगा लक्ष्मण ओडेदरा या वेळी पोरबंदरमधील कुतियाना मतदारसंघातून भाजपकडून उभा आहे. भीमा डुला ओडेदरांचे मोठे भाऊ कर्सन ओडेडरा १९९८ पासून २०१२ पर्यंत आमदार होते. गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या कंधाल जाडेजा यांनी त्यांचा पराभव केला. जाडेजा म्हणजे ‘गॉडमदर’ संतोकबेन जाडेजांचा मुलगा. गिरणी कामगार असलेल्या सर्मन मुंजा जाडेजांनी संप फोडण्यासाठी आलेल्या गुंडाचा खून केला. पती सर्मन यांचा खून झाल्यावर संतोकबेननी अंडरवर्ल्डचा कारभार हाती घेतला. अशा प्रकारे गुन्हेगारी जगतावर राज्य करणाऱ्या या बहुधा एकमेव महिला असतील. जनता दलाच्या तिकिटावर त्या १९९० मध्ये निवडूनही आल्या होत्या. १९९९ मध्ये त्यांच्या आयुष्यावर चित्रपटही आला. २००१ मध्ये त्या गेल्या. कंधालवरही खून, दंगलीचे आरोप आहेत.
शेजारच्या पोरबंदर मतदारसंघामधील जागेवर भाजपच्या तिकिटावर बाबूभाई बोखिरिया उभे आहेत. लखन ओडेदरांचे ते नातलग. त्यांच्यावर खून, दंगली आणि भ्रष्टाचाराचेही आरोप आहेत. भाजप सरकारमध्ये सध्या जलसंवर्धन, शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्य उद्योगमंत्री असलेल्या बोखिरियांना ५४ कोटी रुपयांच्या खाण घोटाळाप्रकरणी भाजप सरकारच्या काळातच काही दिवस तुरुंगवास भोगावा लागला. बोखिरियांसमोर उभे आहेत काँग्रेसचे अर्जुन मोढवाडिया. गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष आणि २००४ ते २००७ दरम्यान विरोधी पक्षनेते राहिलेल्या मोढवाडियांचे वडील मुलु मोढवाडिया यांचा २००५ मध्ये खून करण्यात आला. त्याचा आरोप भीमा डुला ओडेदरांसोबत बोखिरियांवरही होता. मात्र एप्रिल २०१४ मध्ये त्यांना याप्रकरणी निर्दोष जाहीर करण्यात आले. कुतियाना आणि पोरबंदरमधील लढतीत उतरलेल्या या चार प्रमुख उमेदवारांना जोडणारा धागा म्हणजे हे सर्व मेर जातीचे आहेत.
पोरबंदरमधली लढाई
बाजूच्या पोरबंदरच्या जागेवर बाबूभाई बोखिरिया यांना निवडून आणण्यासाठीही भाजपने जोरदार तयारी केली आहे. मुंबई महानगरपालिकेतील भाजपचे गटनेता मनोज कोटक आणि त्यांचे २० कार्यकत्रे गेला महिनाभर या ठिकाणी ठाण मांडून आहेत. तर, राहुल गांधी यांनी बंदरावर घेतलेली सभा आणि गेल्या निवडणुकीत प्रचाराला आलेल्या नरेंद्र मोदींची अनुपस्थिती या दोन्ही बाबी काँग्रेसच्या पथ्यावर पडणार असल्याचे येथील मेर समाजाचे नेते सांगतात. राहुल गांधी यांनी जुन्या बंदरावर घेतलेली लहानशी सभा राष्ट्रभर गाजली ती येथील मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष असलेल्या भारत मोदींमुळे. मी भाजपचा कार्यकर्ता आहे, असे सांगत त्यांनी मच्छीमारांच्या समस्या मांडल्या आणि शेतीमध्ये न जोडता मत्स्य विभागासाठी वेगळ्या मंत्रालयाची मागणी केली. या घटनेनंतर भारत मोदींना भाजपमधून काढण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र मच्छीमारांचा दबाव लक्षात घेता तसे काही झाले नाही. पोरबंदरमध्ये मेर समाजाचे साधारण ७० हजार मतदार, ब्राह्मण ५० हजार, कोळी ३० हजार, लोहाणा १८ हजार व इतर असे एकूण २ लाख ३० हजार मतदार आहेत.
मेर समाजाचा प्रभाव
सर्व गुजरातमध्ये पाटीदारांचा आवाज घुमत असताना अहमदाबादपासून ४०० किलोमीटर दूर, गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीवर व पाकिस्तानपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पोरबंदरमध्ये मात्र मेर समाजाचा प्रभाव आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादीने येथे मेर समाजातील उमेदवारच दिले आहेत. या दोन्ही मतदारसंघांत एकूण १ लाख ४१ हजार मेर आहेत. एकूण मतदारांच्या तुलनेत ते ३० टक्के आहेत. कुतियानामध्ये काँग्रेसचा उमेदवारही आहे. मात्र लखन ओडेदरा आणि कंधाल जाडेजा यामध्ये थेट लढत होईल, असे येथील काँग्रेसचे कार्यकत्रे सांगतात. काँग्रेसच्या उमेदवाराने जरा जास्त प्रचार केला तर भाजपचा उमेदवार जिंकून येईल, अशी अटकळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी बांधली आहे. मात्र या नामी उमेदवारांच्या लढतीत आपला बळी जाण्याची शक्यता लक्षात घेऊनच ते प्रचारात उतरत नसल्याचे इथे बोलले जाते. इथे राजकीय पक्षापेक्षा उमेदवार महत्त्वाचे ठरत आहेत. मात्र गुजरातमध्ये अटीतटीची लढत होत असल्याने भाजप व राष्ट्रवादी हे दोन्ही या जागेसाठी आग्रही आहेत.