Coldrif Cough Syrup Updates : गेल्या काही दिवसांपासून देशभरातील विविध शहरांत कोल्ड्रीफ या कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांना आपला जीव गमावावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आतापर्यंत विषारी कफ सिरप प्यायल्याने किमान २२ मुलांचा मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर आले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात काही दिवसांपूर्वी कोल्ड्रिफ कफ सिरप बनवणाऱ्या फार्मास्युटिकल कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता तामिळनाडू सरकारने संबंधित कंपनीवर आणखी एक मोठी कारवाई केली आहे. कोल्ड्रिफ कप सिरप बनवणाऱ्या कंपनीचा परवाना तामिळनाडू सरकारने रद्द केला आहे. या संदर्भातील वृत्त पीटीआयच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

तामिळनाडू सरकारच्या अधिकाऱ्यांना या कोल्ड्रिफ कप सिरप बनवणाऱ्या कंपनीबाबत अनेक गंभीर गोष्टी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीकडे योग्य उत्पादन पद्धती आणि चांगल्या प्रयोगशाळा नव्हत्या, या कंपनीने अनेक नियमांचं उल्लंघन केल्याची नोंद तामिळनाडू सरकारच्या अधिकाऱ्यांनी नोंदवली आहे.

वृत्तानुसार, तामिळनाडू सरकारने सोमवारी भेसळयुक्त कफ सिरप कोल्ड्रिफची उत्पादक श्रीसन फार्मास्युटिकल कंपनी बंद करण्याचे आदेश देत कंपनीचा उत्पादन परवाना पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच तामिळनाडू सरकारने या फार्मास्युटिकल कंपनीला त्यांचा औषध परवाना (ड्रग लायसन्स) रद्द का करू नये? अशी विचारणा करणारी नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता सरकारने थेट औषध परवाना रद्द केला आहे.

अनेक राज्यात कोल्ड्रीफ कफ सिरपवर बंदी

कोल्ड्रीफ कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांनी आपला जीव गमावल्याच्या घटनानंतर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूसह आदी राज्यांनी या कोल्ड्रीफ कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे.

कंपनीबाबत धक्कादायक माहिती उघड

अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतील एका कारखान्याची झडती घेतली. कोल्ड्रिफ हे खोकल्याचे सिरपदेखील याच कारखान्यात तयार होते. या तपासात अधिकाऱ्यांना धक्कादायक गोष्टी दिसून आल्या. त्यांना उघड्या गॅसच्या शेगड्यांवर रसायनांचे मोठे ड्रम दिसले, ज्यातील रसायन उकळत होते. तिथे प्लास्टिकच्या पाईप्समधून एका पदार्थाची गळती होत होती आणि कंपनीत सर्वत्र गंजलेली उपकरणे पडलेली होती. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, हातमोजे किंवा मास्क नसलेले कामगार निष्काळजीपणे घटक मिसळत होते. मध्य प्रदेश अन्न व औषध प्रशासन (FDA) कडून मिळालेल्या माहितीनंतर, तामिळनाडूच्या औषध नियंत्रण विभागाने १ आणि २ ऑक्टोबर रोजी कांचीपुरम येथील श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या युनिटवर छापा टाकला होता.