भाजपाच्या यापुढच्या पत्रकार परिषदेत अमित शाह मोदींना किमान दोन प्रश्नांची उत्तरं देऊ देतील अशी अपेक्षा आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक शब्दात निशाणा साधला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेला सामोरे का जात नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला होता. याच प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचा प्रचार संपताना भाजपाची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेला अमित शाह यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. आपला प्रचाराचा अनुभव कसा होता, आपण देशवासीयांचे आभारी आहोत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची भूमिका मांडली.

राहुल गांधी यांनीही पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जेव्हा राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रकार परिषदेबाबत विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दरवाजे बंद करून पत्रकार परिषद घेत आहेत. पाच वर्षात पहिली पत्रकार परिषद ती देखील सरकारचा कार्यकाळ संपताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. मात्र दार बंद करून पंतप्रधान पत्रकार परिषद घेत आहेत. माझ्याशी वाद घालण्याची हिंमत त्यांच्यात नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

भाजपाच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांचेही नरेंद्र मोदींनी आभार मानले. मात्र या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. एक प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हटले की अमित शाह हे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत तेच उत्तर देतील. हाच मुद्दा पुढे आणत राहुल गांधी यांनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. निदान पुढच्या वेळच्या पत्रकार परिषदेत अमित शाह मोदींना बोलू देतील किमान दोन प्रश्नांची उत्तरं देऊ देतील असं खोचक ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.