लोकसभेची चाचणी समजल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड तेलंगणामध्ये मतमोजणी सुरू आहे. सध्या हाती आलेल्या कलानुसार छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपाने आघाडी घेत काँग्रेसला धक्का दिला आहे. तर, तेलंगणात भारत राष्ट्र समितीला ( बीआरएस ) धक्का देत काँग्रेसने मुसंडी मारली आहे. अशातच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘इंडिया’ आघाडीची बैठक बोलावली आहे.
काँग्रेसनं बुधवारी ६ डिसेंबरला नवी दिल्लीत इंडिया आघाडीतील मित्रपक्षांची बैठक बोलावली आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी डीमएमके, तृणमूल काँग्रेससह इंडिया आघाडीतील मित्र पक्षांशी बैठकीबाबत संपर्क साधला आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामधील निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर ६ डिसेंबरला ही बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल खूप महत्वाचे आहेत. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये भाजपा ५३ तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. तर, तेलंगणात काँग्रेस ६८ आणि भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) ३६ आणि भाजपाचे ८ उमेदवार आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशात भाजपा १६१ तर काँग्रेस ६६ आघाडीवर असल्याचं दिसत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपा ११२ तर काँग्रेस ७२ जागांवर आघाडीवर आहे.