काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच काँग्रेस नेते राहुल गांधी यानी जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा आणि नि:पक्ष आणि स्वतंत्र विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. “मी सुद्धा काश्मिरी पंडित आहे. माझ्यात थोडीशी काश्मिरियत आहे. गुलाम नबी आझाद यांनी संसदेत काश्मीरचा मुद्दा उचलण्यास सांगितलं होता. मात्र सरकारने परवानगी दिली नाही. पेगॅसस, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीचा मुद्दा उचलू इच्छित होतो, मात्र बोलू दिलं नाही.”, असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.
“ही बाब फक्त जम्मू काश्मीरची नाही, तर सर्व संस्थानांची आहे. न्यायपालिका, राज्यसभा आणि लोकसभेवर दबाव आणला जात आहे. मीडिया खरं दाखवत नाही, मीडियाचा आवाज दाबला जात आहे” असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. “सध्या आमचे कुटुंब दिल्ली राहात आहे. त्यापूर्वी अलाहाबाद आणि त्याच्याही आधी काश्मीरमध्ये वास्तव्यास होते. काश्मिरियत माझ्या नसानसात आहे. जम्मू काश्मीरच्या जनतेचं दुख मी समजू शकतो”, असंही राहुल गांधी यांनी सांगितलं. राहुल गांधी यांनी या दौऱ्यादरम्यान खीर भवानी माता मंदिर, मीर बाब हैदर अली दर्गा येथे भेट दिली. श्रीनगरमध्ये नवं काँग्रेस भवन तयार करण्यात आलं आहे. त्याचं उद्घाटन काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आलं. या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
जम्मू काश्मीरमध्ये केंद्र सरकारने २०१९ मध्ये अनुच्छेद ३७० हटवलं होतं. ५ ऑगस्ट २०२१ रोजी याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सराकने जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवलं आहे. त्याचबरोबर लडाखला वेगळं केंद्रशासित प्रदेश विभाजन केलं आहे.
