लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात असून या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा झालेली नाही, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (संपुआ) दारुण पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या नामुष्कीजनक पराभवाची जबाबदारी स्वीकारत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव कार्यकारिणीने एकमताने फेटाळला होता. मात्र, त्यानंतरही राहुल गांधी राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे गुरुवारी दुपारी दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले. या दोन्ही नेत्यांमध्ये अद्याप चर्चा सुरू आहे.
Congress President Rahul Gandhi meets NCP leader Sharad Pawar at Pawar's residence in Delhi. pic.twitter.com/jKkH1mGsOB
— ANI (@ANI) May 30, 2019
लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच रहावे, यासाठी राहुल गांधी हे शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार, असे वृत्त एबीपी माझा आणि अन्य वृत्तवाहिन्यांनी दिले. मात्र, शरद पवारांनी याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असे स्पष्ट केले. पर्याय नसताना मैदान सोडणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये, असे स्पष्ट केले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक झाली होती. आगामी विधानसभा निवडणुकीला एकजुटीने सामोरे जाण्याचा निर्धार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला होता.