‘गुजरात विधानसभेत यावेळी एक नवे नेतृत्व निर्माण झाले आहे. हे नेतृत्व पुढच्या निवडणुकीत गुजरातचे सरकार चालवणार आहे. आपण पहात रहा, मी या स्टेजवरुन आपल्याला सांगू इच्छितो की, गुजरातमध्ये पुढील निवडणुकीत काँग्रेसचा १३५ जागांवर विजय होईल,’ असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी गुजरात दौऱ्यादरम्यान, अहमदाबाद येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
https://twitter.com/ANI/status/944552405093384194
राहुल म्हणाले, काँग्रेस ही निवडणूक लढवू शकेन की नाही असे प्रश्न गेल्या ४-५ महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये विचारले जात होते. काँग्रेसच्या विजयाची कोणीही चर्चा करीत नव्हते. भाजपचे लोक म्हणत होते की, काँग्रेसच्या २०-२५ जागा येतील आणि आमच्या १५० जागा. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही, काँग्रेसने भाजपला येथे जोरदार टक्कर दिली.
https://twitter.com/ANI/status/944547426160877568
‘काँग्रेस एक साथ उभी राहिल्यास कधीही हारणार नाही. गुजरात निवडणुकीत आम्ही हारलो असलो तरीही आमचा विजय झाला. कारण, त्यांच्याजवळ सर्व साधने उपलब्ध होती, ते चिडून निवडणूक लढले. मात्र, आम्ही प्रेमाने लढलो, आमला केवळ सत्याची साथ होती. ९० टक्के लोक आमच्यासोबत लढले तसेच अनेकांनी निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने प्रयत्न केले. मात्र, ५ ते १० टक्के लोक असे होते ज्यांनी काँग्रेसला कसलीच मदत केली नाही, अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.’ असा इशारा यावेळी राहुल गांधी यांनी दिला.
दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर काल काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत पहिल्यांदा राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले, भाजपची संपूर्ण रचनाच खोटारडेपणावर आधारित आहे. आपण गुजरातचे मोदी मॉडेल पाहिले तर ते देखील संपूर्ण खोटे असल्याचे त्यांनी म्हटले होते.