करोना व्हायरस म्हटलं की आपल्यासमोर ती दोन वर्षे उभी राहतात ज्या दोन वर्षांत आपण लॉकडाऊन, व्हायरस, संसर्ग, मास्क, सुरक्षित अंतर हे सगळे शब्द ऐकले आणि तो काळ आपण अनुभवला. करोनाची लाट येणं, त्यात होणारे मृत्यू यामुळे रोजच सगळेजण धास्तावल्याचं चित्र होतं. हा आजार फक्त भारतात नाही तर जगभरात पसरला होता. मात्र यावर उपाय म्हणून प्रतिबंध म्हणून आपल्या देशाने दोन लशी शोधल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. या दोन लसी देशभरात तर दिल्या गेल्याच पण जगातल्या अनेक देशांनाही आपण या लसी पुरवल्या. आता दोन पैकी कोणती लस परिणामकारक आहे याचं उत्तर अभ्यास अहवालातून समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करोना काळात लसीकरण मोहीम

करोना काळात केंद्र सरकारकडून संपूर्ण देशात लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सीन’ या दोन लसी भारतीयांना देण्यात आल्या. संपूर्ण लसीकरण मोहीमेदरम्यान एक प्रश्न सातत्यानं चर्चेत होता, तसेच, हाच प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनातही होता, तो म्हणजे, या दोन लशींपैकी सर्वात परिणामकारक लस कुठली?’कोविशिल्ड’ की ‘कोवॅक्सिन’? करोना काळात कोविशिल्ड ही लस घेण्यासाठी लोक स्लॉट बुक करत होते तसेच कोवॅक्सिन घेण्यासाठीही स्लॉट बुक करत होते. अनेकांनी तर बूस्टर डोसही घेतले. आता या दोन लशीपैकी कोणती लस परिणामकारक ? याचं उत्तर एका संशोधन अहवालात मिळालं आहे.

लॅसंट रिजनल हेल्थ साऊथ इस्ट आशिया या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधन अहवालात या प्रश्नाचं उत्तर समोर आलं आहे. हे संशोध ११ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सवर करण्यात आलं आहे. या संशोधन अभ्यासत नॅशनल सेंटर बायोलॉजिकल रिसर्चच्या संशोधकाचाही समावेश होता.

कोणती लस अधिक परिणामककारक?

या संशोधनातून जे उत्तर समोर आलं आहे त्यानुसार कोविशिल्ड ही लस कोवॅक्सिनच्या तुलनेत परिणामकारक असल्याचं समोर आलं आहे. या महत्वाच्या संशोधनामुळे दोन्ही लशींचा तुलनात्मक डेटा समोर आला आहे. तसंच भविष्यात अशा प्रकारे संशोधन करण्यासाठी काय पर्याय असू शकतात, यांचाही विचार करण्यात आला आहे. हे संशोधन जून २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत करण्यात आलं. यामध्ये ६९१ व्यक्तींचा समावेश होता. संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्ती या १८ ते ४५ या वयोगटांतील होत्या. संशोधनातल्या सहभागी व्यक्ती पुणे आणि बंगळुरुच्या होत्या. लस घेण्या पूर्वी आणि नंतर लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढली किंवा कमी झाली यांचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. द मिंटने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कोविशिल्ड सर्वात परिणामकारक

करोना प्रतिबंधासाठी ज्यांनी कोविशिल्ड लस घेतली होती त्यांची प्रतिकारशक्ती कोवॅक्सिन घेतलेल्यांच्या तुलनेत वाढल्याचं दिसून आलं.

कोविशिल्ड घेतलेल्यांमध्ये अँटीबॉडीजची लेव्हल चांगली वाढल्याचं दर्शवलं. तसंच इम्यून रिस्पॉन्सही वाढल्याचं दाखवलं.

Covishield ने Covaxin पेक्षा जास्त T पेशी निर्माण केल्या, ज्या चांगला इम्यून रिस्पॉन्स दर्शवतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid 19 vaccine covishield outperforms covaxin in first of its kind comparative study scj