Indian Tourists Turn Their Backs On Turkey And Azerbaijan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष झाला होता. या लष्करी संघर्षादरम्यान तुर्की आणि अझरबैजानने पाकिस्तानला पाठींबा दिला होता. यानंतर भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या या दोन्ही देशांमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, असा दावा विविध मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
मे महिन्यात अझरबैजानने या संघर्षावर पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन केले, तर तुर्कीने पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याच्या पाकिस्तानच्या मागणीला पाठिंबा दिला होता. तुर्कीने लष्करी संघर्षादरम्यान पाकिस्तानला शस्त्रेही पुरवली होती.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तातील ताज्या आकडेवारीनुसार, अझरबैजानमध्ये ही घट अधिक आहे. अझरबैजानमध्ये मे-ऑगस्ट या कालावधीत भारतातील पर्यटकांमध्ये ५६ टक्के घट झाली आहे, तर तुर्कीमध्ये ३३.३ टक्के घट झाली आहे.
अझरबैजान पर्यटन मंडळाच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, जानेवारी-एप्रिलमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या दरवर्षी ३३ टक्क्यांनी वाढली होती, परंतु त्यानंतरच्या चार महिन्यांत ती जवळपास ५६ टक्क्यांनी घसरली आहे.
भारत-पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्षाचा शस्त्रविराम झाल्यानंतर तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर अनेक भारतीय प्रवाशांनी त्यांच्या सहली रद्द केल्या होत्या.
“अझरबैजान आणि तुर्कीसाठी बुकिंगमध्ये (गेल्या आठवड्यात) ६०% घट झाली आहे, तर २५०% पर्यटकांनी त्यांच्या सहली रद्द केल्या आहेत,” असे मेकमायट्रिपच्या प्रवक्त्याने मे महिन्यात रॉयटर्सला सांगितले होते.
इझ माय ट्रिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिकांत पिट्टी म्हणाले की, भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षानंतर पर्यटक जॉर्जिया, सर्बिया, ग्रीस, थायलंड आणि व्हिएतनामसारख्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य देत आहेत.
भारत-पाकिस्तान लष्करी संघर्ष
मे महिन्यात जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ज्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने पाकिस्तानस्थित दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. भारताच्या या हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्ताननेही अयशस्वी हल्ले करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र, भारतीय लष्कराने ते यशस्वीपणे परतावून लावले होते.