Delhi Car blast : दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरातील मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ च्या बाहेर भीषण स्फोट झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी घडली होती. या स्फोटात किमान १० जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. हा भीषण स्फोट घडवून आणणारा व्यक्ती काश्मीरमधील डॉ. उमर नबी होता, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आलेली आहे.
दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर काही दिवसांतच आरोपी उमर नबीचं पुलवामा येथील निवासस्थान सुरक्षा यंत्रणांनी पूर्णपणे उद्ध्वस्त करत कारवाई केली होती. त्यानंतर आता या स्फोट प्रकरणात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. या स्फोटाच्या घटनेतील आरोपी डॉ. उमर नबी याचा एक सहकारी दानिश याला अटक केली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
वृत्तानुसार, एनआयएच्या पथकाने ही कारवाई केली असून जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला श्रीनगर येथून अटक करण्यात आली आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या घातक कार स्फोटापूर्वी दानिशने ड्रोन किंवा रॉकेट बनवण्याचा प्रयत्न करून हल्ल्यांना तांत्रिक मदत पुरवल्याचं एनआयएच्या प्राथमिक चौकशीत उघड झाल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
दानिश हा जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील असून दिल्ली स्फोटाच्या घटनेत षड्यंत्रकारी होता. आरोपी उमर नबी आणि दानिश हे दोघे पहिल्यांदा काश्मीरमध्ये भेटले होते आणि त्यानंतर आरोपी उमर नबीने दानिशचं ब्रेनवॉश केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील कटाच्या प्रत्येक पैलूला तपास यंत्रणा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच आरोपींच्या नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये अनेक पथके कारवाई करत आहेत.
दिल्ली स्फोट प्रकरणातील आरोपी उमर नबीचं घर सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
दिल्ली स्फोटाच्या घटनेत सुरक्षा यंत्रणा कडक कारवाई करत आहेत. आरोपी उमर नबीच्या पुलवामा येथील निवासस्थानावर शुक्रवारी सुरक्षा दलांनी कारवाई करत उद्ध्वस्त केलं आहे. तपासाचा भाग म्हणून हे घर उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
दिल्लीत नेमकं काय घडलं होतं?
राजधानी दिल्ली सोमवारी (१० नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या स्फोटामुळे हादरली. संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक १ जवळ एका ह्युंदाई आय-२० कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटानंतर तिथे मोठा आगीचा भडका उडाला. त्यामुळे या कारच्या आसपास उभ्या असलेल्या इतर काही वाहनांना देखील आग लागली. दिल्ली गेट ते काश्मिरी गेटला जोडणाऱ्या रस्त्यावर हा स्फोट झाला. हा वर्दळीचा रस्ता असल्यामुळे ऐन संध्याकाळी या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी होती. त्यातच हा स्फोट झाल्यामुळे मोठी जीवितहानी झाली.
