Delhi Crime News : गुन्हेगारीच्या घटना कमी होण्यासाठी सातत्याने पावलं उचलले जातात. मात्र, तरी देखील गुन्हेगारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. देशभरात दररोज अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या संदर्भातील घटना घडल्याच्या बातम्या समोर येतात. आता दिल्लीत एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील मदनगीर भागात एका २८ वर्षीय तरुणावर त्याच्या पत्नीने झोपेत असताना त्याच्यावर लाल मिरची पावडर मिसळलेलं उकळतं तेल ओतल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये तो २८ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे, तो जीवाशी झुंजत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या संदर्भातील वृत्त पीटीआयच्या हवाल्याने हिदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

वृत्तानुसार, हा २८ वर्षीय तरुण गंभीर भाजल्यानंतर सध्या एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:१५ च्या सुमारास घडली. या प्रकरणात दाखल एफआयआरनुसार, तो तरुण झोपलेला होता. झोपलेला असताना पत्नीने त्याच्यावर गरम तेल ओतलं. तेव्हा त्यांची आठ वर्षांची मुलगीही घरात होती. त्यानंतर तो मोठ्याने ओरडत होता, तरीही पत्नी त्याच्यावर गरम तेल ओतत होती आणि भाजलेल्या जखमांवर वरून लाल मिरची पावडर शिंपडत होती, असा आरोप त्याने केला आहे.

तसेच जेव्हा त्याने विरोध केला तेव्हा त्याच्या पत्नीने धमकी दिल्याचाही आरोप त्याने केला आहे. “जर तू ओरडलास तर मी तुझ्यावर आणखी तेल ओतेन”, अशी धमकी पत्नीने दिल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. मात्र, घटना घडल्यानंतर आरडाओरडा झाला आणि शेजारी मदतीला धावल्यानंतर त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं काय घडलं?

दरम्यान, या २८ वर्षीय तरुणाने पोलिसांना सांगितलं की, तो २ ऑक्टोबर रोजी काम संपवून उशिरा घरी परतला, जेवण केलं आणि झोपायला गेला. तेव्हा पत्नी आणि मुलगी जवळच झोपल्या होत्या. पहाटे ३.१५ च्या सुमारास मला अचानक माझ्या संपूर्ण शरीरात तीव्र वेदना जाणवू लागल्या. माझी पत्नी उभी असलेली आणि माझ्यावर उकळतं तेल ओतताना दिसली. मी मदतीसाठी हाक मारत असतानाच तिने माझ्यावर लाल मिरची पावडर शिंपडली, असा आरोप त्याने तक्रारीत केला असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.