Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवलं. त्यामुळे आता दिल्लीत भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीच्या निवडणुकीत भाजपाला ४८ आणि आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या आहेत, तर काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. निकालानंतर दिल्लीत भाजपाचं सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय हालचाली सुरु आहेत. पुढील काही दिवसांत दिल्लीत सरकार स्थापन होईल असं बोललं जात आहे. दिल्लीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव होताच दिल्लीच्या उपराज्यपालांनी दिल्ली सचिवालयात प्रवेश बंदीचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर आणि भाजपाच्या विजयानंतर दिल्ली सचिवालयात प्रवेश बंदी करण्यात आल्यामुळे यामागे नेमकं काय कारण आहे? याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता असताना गेल्या १० वर्षात नेमकं कोणते निर्णय घेण्यात आले? काही भ्रष्ट्राचार झाला का? यासंदर्भातील फाईली बाहेर जाऊ नये, म्हणून दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांनी दिल्ली सचिवालयात प्रवेश बंदी करण्याचे आदेश दिल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सक्सेना यांच्या या आदेशाचा उद्देश हा सरकारी कागदपत्रे आणि डेटाची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या परवानगीशिवाय सचिवालयामधून कोणत्याही फाइल्स, दस्तऐवज किंवा संगणक कागदपत्रे बाहेर नेता येणार नाहीत. तसेच सचिवालयाच्या परिसरात व्यक्तींना प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. याबरोबरोच सचिवालयाच्या सुरक्षा मजबूत करण्याचे आदेश दिले असल्याचंही वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, फायलींच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात म्हटलं म्हटलं आहे. दशकभराच्या सत्तेनंतर भाजपाने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर हे आदेश जारी करण्यात आला आहे. हा आदेश सचिवालयातील सर्व अधिकारी, मंत्र्यांची ऑफिस आणि दोन्ही कार्यालयांचे प्रभारी यांना लागू असणार असल्याचंही आदेशात म्हटलं आहे. तसेच खाजगी व्यक्तींना त्यांची ओळख आणि भेटीचा उद्देश यांची योग्य पडताळणी केल्यानंतरच सचिवालयात प्रवेश दिला जाणार असल्याचंही म्हटलं आहे. याबरोबरच खासगी सुरक्षा रक्षकांना दिल्ली सचिवालयाच्या सर्व मजल्यांवरील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व मजल्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत राहतील याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi election result 2025 no files will go out delhi secretariat barred orders of the lieutenant governor gkt