New York City Mayoral Election 2025 Zohran Mamdani: न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि भारतीय वंशाचे नागरिक जोहरान ममदानी (३४) यांचा मोठा विजय झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांना उघड विरोध केला होता. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी ममदानी विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार आणि माजी गव्हर्नर अँड्रयू कुओमो, तसेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कर्टिस स्लिवा यांचा पराभव केला.

मंगळवारी मतदानासाठी मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले. शहर निवडणूक मंडळाच्या मते २० लाखांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १९६९ नंतर पहिल्यांदाच असे घडले आहे, असे द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले. जोहरान ममदानी यांना ९,४८,२०२ मते (५०.६ टक्के) मिळाली. अपक्ष उमेदवार अँड्रयू कुओमो यांना ७,७६,५४७ (४१.३ टक्के) आणि कर्टिस स्लिवा यांना १,३७,०३० इतके मतदान झाले.

या विजयामुळे जोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लीम तसेच आजवरचे सर्वात तरूण महापौर बनले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांचा उघड विरोध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ममदानी यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासून उघड विरोध केला होता. २९ सप्टेंबर रोजी त्यांनी न्यूयॉर्कच्या मतदारांना उद्देशून सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ममदानी जर निवडून आले तर न्यूयॉर्क शहराचा निधी अडवू, असा इशारा त्यांनी दिला होता.

“ममदानी हे न्यूयॉर्क शहरातील स्वयंघोषित कम्युनिस्ट आहेत. ते जर महापौरपदाची निवडणूक जिंकले तर त्यांना वॉशिंग्टनकडून विरोधाचा सामना करावा लागेल. न्यूयॉर्क सारख्या महान शहराच्या महापौराने इतिहासात कधीही वॉशिंग्टनशी वैर घेतले नव्हते. मात्र ममदानी यांच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील. लक्षात ठेवा, महापौर म्हणून निवडून आल्यावर त्यांना त्यांच्या कम्युनिस्ट आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी माझ्याकडूनच निधीची गरज भासेल. त्यांना अजिबात निधी दिला जाणार नाही. मग त्यांना मतदान करण्यात काय अर्थ आहे?”, अशी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती.

अमेरकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सप्टेंबर महिन्यात ममदानी यांच्याबद्दल पोस्ट केली होती.

जोहरान ममदानी कोण आहेत?

  • जोहरान ममदानी यांच्या आई-वडिलांचा जन्म भारतातला आहे. त्यांचे वडील महमूद ममदानी हे युगांडाचे नागरिक आहेत. तर आई मीरा नायर या भारतातील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक आहेत.
  • जोहरान यांचा जन्म आणि संगोपन युगांडातील कंपाला येथे झाले आहे.
  • ते सात वर्षांचे असताना आपल्या पालकांसह न्यूयॉर्कला स्थलांतरित झाले.
  • २०१८ मध्ये त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले आणि त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सीरियन कलाकार रामा दुवाजीशी लग्न केले.