Donald Trump on India Pakistan Conflict : भारत आणि पाकिस्तानदरम्यान मे महिन्यात झालेल्या लष्करी संघर्षादरम्यान दोन्ही देशांनी एकमेकांची मिळून पाच लढाऊ विमाने पाडली होती, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा केला आहे. “दोन्ही देश अणूयुद्धाच्या उंबरठ्यावर होते. मात्र, मी ते युद्ध थांबवलं” असंही त्यांनी बऱ्याचदा म्हटलं आहे. आता ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धाबाबत नवा दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले, “भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान दोन्ही देशांनी सात लढाऊ विमानं पाडली होती.”

डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत ३० हून अधिक वेळा भारत-पाकिस्तान युद्ध रोखल्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हे श्रेय घेत असताना त्यांनी आतापर्यंत वेगवेगळे दावे गेले आहेत. बऱ्याचदा त्यांच्या दोन दाव्यांमध्ये तफावत आढळली आहे. त्यामुळे ट्रम्प खरं बोलत असतील का याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. ट्रम्प यांच्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

भारत-पाकिस्तानने एकमेकांची सात लढाऊ विमानं पाडली : ट्रम्प

अमेरेकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की त्यांनी आतापर्यंत सहा युद्धं रोखली आहेत. यामध्ये भारत-पाकिस्तान युद्धाचा देखील समावेश आहे. ते म्हणाले, “हे युद्ध अणू युद्धात रुपांतरित होणार होतं. परंतु, मी मध्यस्थी करून ते थांबवलं. त्यांनी आधी एकमेकांची सात लढाऊ विमानं पाडली होती. युद्ध आणखी तीव्र होणार होतं.”

नेमकी किती विमानं पाडलं? भारताने काय म्हटलंय?

ट्रम्प यांच्या दाव्यांमधील विमानांची संख्या सातत्याने बदलत आहे. ते कधी दावा करतात पाच विमानं पाडली, कधी सहा विमानं पाडल्याचं वक्तव्य करतात, तर आता त्यांनी म्हटलं आहे की या युद्धात दोघांनी एकमेकांची सात विमानं पाडली आहेत. दरम्यान, भारतीय हवाई दलाने आपल्या अधिकृत निवेदनात पाकिस्तानची पाच लढाऊ विमानं व एक AEW&C विमान पाडल्याची पुष्टी केली आहे. म्हणजेच विमानांची एकूण संख्या सहा होती.

युद्ध रोखण्यात तिसऱ्या देशाचा सहभाग नव्हता : मोदी

दरम्यान, ट्रम्प सातत्याने दावा करत आहेत की त्यांनी भारत-पाकिस्तान युद्ध रोखलं. मात्र, भारताने प्रत्येक वेळी ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे. भारताने म्हटलं आहे की दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बातचीत करून युद्धविरामाचा निर्णय घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत स्पष्ट केलं होतं की भारत-पाकिस्तान संघर्ष रोखण्यात कुठल्याही तिसऱ्या देशाचा सहभाग नव्हता. तो दोन देशांनी घेतलेला निर्णय होता.