Volodymyr Zelenskyy On Vladimir Putin : रशिया-युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष अद्यापही थांबलेला नाही. रशिया युक्रेनवर हल्ले करत आहे, तर युक्रेनही रशियावर हल्ले करत आहे. मात्र, रशिया-युक्रेन संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्या मध्यस्थीला यश येताना दिसत नाही. रशिया-युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्याच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट २०२५ रोजी ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली. मात्र, या भेटीनंतरही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
अमेरिकेच्या अलास्कामधील व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबरच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत रशियाबाबत मोठी प्रगती, संपर्कात रहा, अशी सूचक पोस्ट शेअर केली होती. मात्र, भेटीबाबत अधिक तपशील ट्रम्प यांनी शेअर केलेला नाही. दरम्यान, पुतिन-ट्रम्प यांच्या भेटीनंतर आता युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक मोठं विधान केलं आहे. “डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये रशियाला शांततेसाठी भाग पाडण्याची ताकद आहे”, असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की काय म्हणाले?
दरम्यान, पुतिन-ट्रम्प यांच्या भेटीनंतर आता युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की हे डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत आहेत. त्यांच्या या भेटीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. मात्र, या भेटीपूर्वी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक्सवर एक सूचक भाष्य करत एक प्रकारे रशियाला डिवचलं आहे. झेलेन्स्की म्हणाले की, “रशियाला शांततेत आणण्याची ताकद फक्त अमेरिकेकडे आहे. रशियाला केवळ ताकदीच्या जोरावर शांततेत आणता येतं आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ती ताकद आहे. शांतता घडवून आणण्यासाठी आपल्याला सर्वकाही योग्यरित्या करावं लागेल,” असं झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत अद्याप करार नाहीच
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का शिखर परिषदेतील भेट युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत किंवा थांबवण्याबाबत कोणत्याही कराराशिवाय संपली. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर त्यांची आणि व्लादिमीर पुतिन यांची अलास्कामध्ये पहिल्यांदाच भेट झाली. या भेटीनंतर त्यांच्यासोबत उभे राहून व्लादिमीर पुतिन यांनी सांगितलं की, २०२० च्या निवडणुकीनंतर ट्रम्प जर व्हाइट हाऊसमध्ये राहिले असते, तर युक्रेनमधील युद्ध सुरूच झाले नसते, असे त्यांना वाटते. “आज, जेव्हा ट्रम्प म्हणतात की जर ते २०२२ मध्ये राष्ट्राध्यक्ष असते, तर युद्ध झालेच नसते आणि मला खात्री आहे की हे खरे आहे. मी याला दुजोरा देऊ शकतो”, असं पुतिन यांनी म्हटलं. मात्र, या भेटीत युक्रेन-रशियामधील युद्ध संपवण्याबाबत अद्याप करार झालेला नाही.