मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण असे दोन मुद्दे महाराष्ट्रात चर्चेत आहेत. सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. तर ओबीसी समाजाचं आरक्षण डावललं जाऊ नये यासाठी लक्ष्मण हाकेंनीही लढा उभा केला आहे. एकीकडे या गोष्टी राज्यात सुरु असताना तिकडे बांगलादेशात दोन गटांत सरकारी नोकऱ्यांवरुन हाणामारी झाली आहे. आरक्षण हा मुद्दा तिथेही चर्चेत आहे. आरक्षण या मुद्द्यावर झालेल्या या हाणामारीत अनेकजण जखमीही झाले आहेत.

ढाका शहरात नेमकं काय घडलं?

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ढाका येथील जहांगीर नगर विद्यापीठाबाहेर विद्यार्थी एकमेकांना भिडले. ही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की शेवटी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि ही गर्दी पांगवावी लागली. या सगळ्या झटापटीत आणि हाणामारीच्या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण हवं या मुद्द्यावरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. सरकारच्या बाजूने असलेल्या विद्यार्थ्यांची संघटना आणि चळवळ करणाऱ्या विद्यार्थ्यांची संघटना असे विद्यार्थी जहांगीर नगर विद्यापीठाच्या बाहेर एकमेकांना भिडले. यामध्ये डझनभर विद्यार्थी जखमी झाले आहेत अशी माहिती बांगलादेश पोलिसांनी दिली.

हे पण वाचा- “अरे बांगलादेश आहे की भारत?” रेल्वेस्थानकावरील video तील ‘ही’ दृश्ये पाहून युजर्सचा प्रश्न; म्हणाले, “गंभीर…”

सरकारी नोकरीसाठी दोन गटांमध्ये संघर्ष

ज्यांनी बांगलादेश च्या १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात योगदान दिलं आहे त्यांच्या कुटुंबातील मुलांना सरकारी नोकरी मिळाली पाहिजे अशी मागणी होते आहे. तसंच महिला, अपंग व्यक्ती आणि अल्पसंख्य या सगळ्यांना सरकारी नोकरीत आरक्षण मिळावं ही मागणी केली जाते आहे. २०१८ मध्ये या सगळ्याला स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या सगळ्या वर्गांना आरक्षण दिलं जावं अशी मागणी होते आहे. याच मुद्द्यावरुन दोन गटांमध्ये हाणामारी झाली. ज्येष्ठ नागरिकांच्या वंशजांसाठी ३० टक्के आरक्षण असावं अशीही मागणी करण्यात आली. बांगलादेश न्यायालयात हा मुद्दा पोहचला. बांगलादेश उच्च न्यायालयाने आरक्षणाच्या बाजूने निकाल दिला. मात्र आता अपंग आणि युद्धात जे शहीद झाले त्यांच्या वंशजांना ६ टक्के आररक्षण मिळावं ही मागणी होते आहे. हा मुद्दा ताजा असल्याने यावरुनच हाणामारी झाली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

बांगलादेशात विद्यार्थ्यांचा प्रचंड राडा, आरक्षणाचा वाद पेटला. (फोटो सौजन्य-एक्स अकाऊंट)

पंतप्रधान शेख हसीना यांनी काय म्हटलं आहे?

दुसरीकडे बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आरक्षणासंबंधीच्या निर्णयाला चार आठवड्यांची स्थगिती दिली. चार आठवड्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असं कोर्टाने म्हटलं ज्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनीही हा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयाच्या दारात आहे असं स्पष्ट केलं.

ही सगळी परिस्थिती असली तरीही ढाका शहरात आरक्षणाचा मुद्दा पेटलेलाच पाहण्यास मिळाला. तासन् तास हिंसाचार सुरु राहिल्याने जहांगीर नगर विद्यापीठ परिसर भागातल्या ५० हून अधिक जखमींवर उपचार करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी अली बिन सोलेमन यांनी ही माहिती दिली.