Drugs Smuggling : देशात अंमली पदार्थांचा विळखा वाढत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अंमली पदार्थांच्या विरोधात अनेकदा कारवाया करूनही अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याची परिस्थिती पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांत तर अनेक शहरांत अंमली पदार्थ आढळून आल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही अंमली पदार्थांचे साठे कसे आढळून येतात? असा सवाल कायम उपस्थित केला जातो.

अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अनेकदा विदेशी नागरिकांचा सहभाग असल्याची देखील माहिती समोर येते. आता या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकार मोठं पाऊलं उचलण्याच्या तयारीत आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १६ हजार विदेशी नागरिकांची भारतातून गच्छन्ती करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

दरम्यान, अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालय संपूर्ण भारतातून अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या जवळपास १६ हजार विदेशी नागरिकांना हद्दपार करणार आहे. तसेच ज्या देशांच्या नागरिकांना हद्दपार केलं जाणार आहे, त्यामध्ये बांगलादेश, फिलीपिन्स, म्यानमार, मलेशिया, घाना आणि नायजेरिया या देशांचा समावेश आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

मागच्या काही महिन्यांत अंमली पदार्थांविरोधी सर्वात मोठ्या कारवाई पैकी एक असलेली कारवाई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) सादर केलेल्या अहवालावर आधारित आहे. या विदेशी नागरिकांवर अंमली पदार्थांच्या तस्करीचे आणि अंमली पदार्थ वाहतुकीच्या गुन्ह्यांचा आरोप असून ते वेगवेगळ्या तुरुंगात आहेत. या संदर्भातील यादी आता गृह मंत्रालय आणि संबंधित यंत्रणांना सुपूर्द करण्यात आली असून त्यावर केंद्रीय गृह मंत्रालय पुढी कार्यवाही करणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.