पीटीआय, नवी दिल्ली
एकापेक्षा जास्त मतदारसंघांच्या मतदारयातीमध्ये नाव नोंदवल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना दिल्लीतील निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी नोटीस बजावली. नवी दिल्लीच्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी खेरा यांना बजावलेल्या नोटिशीची प्रत एक्सवर प्रसिद्ध केली. खेरा यांना ८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
मतचोरी आणि बिहारमधील ‘एसआयआर’च्या मुद्द्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. त्या पार्श्वभूमीवर खेरा यांना ही नोटीस बजावण्यात आल्यामुळे त्याच्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. नोटिशीबद्दल खेरा यांनी तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, या मुद्द्यावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आणि खेरा यांनी भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
खेरा यांचे नाव नवी दिल्ली आणि जंगपुरा या दोन मतदारसंघात नोंदवण्यात आल्याचे आढळले आहे. हा १९५०च्या लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत दंडनीय गुन्हा आहे, असे त्यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आले.
भाजपची टीका, काँग्रेसचे उत्तर
या मुद्द्यावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले. “काँग्रेस पक्ष हा मतचोरांचे उत्तम उदाहरण आहे, आपल्या पक्षाने केलेल्या मतचोरीचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यावर पांघरुण घालण्यासाठी राहुल गांधी बिहारमध्ये मोहीम राबवत होते,” अशी टीका भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली. तसेच, निवडणूक आयोगाने या प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. मात्र, आपल्यावर आरोप करून भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाचा गैरकारभार उघडकीस आणला आहे असे उत्तर खेरा यांनी दिले. आयोगाने मतदारयाद्या तयार करताना सचोटी राखली नाही असे मालवीय यांच्या विधानांवरून स्पष्ट होते अशी टीका खेरा यांनी केली.