|| अनिकेत साठे
बंडखोरांमुळे मार्ग खडतर
मोदी लाटेत उत्तर महाराष्ट्रातील सर्व सहाही जागांवर विजय मिळविणाऱ्या शिवसेना-भाजप महायुतीला यावेळी प्रत्येक जागा कायम राखण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागत आहे. चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या नाशिक, नंदुरबार आणि धुळे मतदारसंघात बंडखोर हे भाजपची डोकेदुखी ठरले. तर दिंडोरीत काँग्रेस महाआघाडीने बळ लावले असले तरी तिरंगी लढत कोणाच्या पथ्यावर पडणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे.
उत्तर महाराष्ट्रात महाआघाडीने शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यातील अपयश मांडून महाराष्ट्राचे पाणी गुजरातला पळवून नेण्यावरून भाजपची कोंडी केली. त्यास मनसेच्या राज ठाकरे यांचीही साथ मिळाली. या टप्प्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभांचे सत्र राबवत विरोधकांचे हल्ले परतावले. देशाची सुरक्षा, राष्ट्रवादाबरोबर केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचे दाखले दिले. दिंडोरी वगळता तीनही मतदारसंघात भाजपला बंडखोरांना आवर घालता आला नाही. नाशिकमध्ये महायुतीला सहजसोपा वाटणारा पेपर चौरंगी लढतीमुळे सोडविताना बरीच मेहनत घ्यावी लागत आहे. महायुतीचे हेमंत गोडसे, महाआघाडीचे समीर भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार आणि भाजप बंडखोर माणिक कोकाटे यांच्यात लढत होत आहे. मागील काही निवडणुकांमध्ये मराठा-ओबीसी राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने यंदाही समीकरणे मांडली गेली. पण, त्याचा तितकासा लाभ एखाद्या घटकास होईल, याबद्दल साशंकता आहे.
दिंडोरीत चुरस
आकाराने अतिशय विस्तृत असणाऱ्या दिंडोरी मतदारसंघात महायुतीच्या डॉ. भारती पवार, महाआघाडीचे धनराज महाले आणि माकपचे जिवा पांडू गावित यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अधिक लक्ष दिले. भाजपने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना प्रचारात उतरवत कोणतीही कसर सोडली नाही. धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनाही बंडखोर आमदार अनिल गोटे यांची उमेदवारी त्रासदायक ठरली. भाजपने हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला असून डॉ. भामरे यांचा सामना महाआघाडीचे आ. कुणाल पाटील यांच्याशी आहे. मंत्रिपदाच्या काळात केलेली विकास कामे, मार्गी लावलेले प्रकल्प यावर भामरेंची भिस्त आहे. सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबार मतदारसंघात महायुतीच्या खा. डॉ. हिना गावित आणि महाआघाडीचे आ. के. सी. पाडवी यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. भाजपचे सुहास नटावदकर यांनी बंडखोरी केल्याने ते किती मते खेचतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे. खा. गावितांविषयी नाराजी असली तरी भाजप समर्थक मोदींसाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. विकास कामे, कार्यकर्त्यांची मोठी फळी, आर्थिक सक्षमता हे डॉ. गावितांचे बलस्थान. धनगर समाजाला दिलेल्या सवलतीने आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार असल्याचा जोरात प्रचार झाला. यामुळे भाजपच्या गोटातही अस्वस्थता पसरली. खुद्द पंतप्रधानांना जाहीर सभेत आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याची ग्वाही द्यावी लागली.