Elon Musk vs Scott Bessent Fight: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात गेल्या काही दिवसांत दुरावा निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे, तर दोघांनीही आक्रमक होत सोशल मीडियावर एकमेकांवर जोरदार टीका आणि गंभीर आरोप केले आहेत.

हा सर्व प्रकार सुरू असताना आता व्हाइट हाऊसमध्ये घडलेली एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. व्हाइट हाऊसमध्ये एलॉन मस्क आणि अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांच्यात हाणामारी झाल्याची नवीन माहिती समोर आली आहे.

एलॉन मस्क यांनी “रग्बी खेळाडूप्रमाणे” स्कॉट बेसेंट यांच्या बरगडीत खांद्याने धक्का दिल्याचे वृत्त द वॉशिंग्टन पोस्टने, डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी स्टीव्ह बॅनन यांच्या हवाल्याने दिले आहे. एप्रिलच्या मध्यात मस्क आणि बेसेंट अंतर्गत महसूल सेवेच्या प्रमुखपदासाठी त्यांच्या पसंतीच्या उमेदवारासाठी लॉबिंग करण्यासाठी ओव्हल ऑफिसमध्ये एकत्र आले होते, तेव्हा ही घटना घडली होती.

बॅनन यांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ला सांगितले की, जेव्हा एलॉन मस्क आणि स्कॉट बेसेंट एका कॉरिडॉरमधून चालत जात होते, तेव्हा त्यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या वेळी स्कॉट बेसेंट यांनी एलॉन मस्क यांना थेट सुनावत, “तू फ्रॉड आहेस”, असे म्हटले.

यावर एल मस्क यांनी रग्बी खेळाडूसारखे त्यांच्या खांद्याने स्कॉट बेसेंट यांच्या बरगड्यांमध्ये धडक दिली. त्यानंतर स्कॉट बेसेंट यांनी देखील मस्क यांच्यावर प्रतिहल्ला केला, असे डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी बॅनन म्हणाले.

पुढे मस्क आणि स्कॉट बेसेंट जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या कार्यालयाजवळ पोहोचले, तेव्हा आवाज ऐकून अनेक कर्मचारी धावले आणि त्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. अखेरीस, मस्क यांना वेस्ट विंगमधून बाहेर काढण्यात आले.

या वर्तनाचे कारण ड्रग्जच्या वापर

दरम्यान दोन दिवसांपूर्वी एलॉन मस्क यांनी आरोप केला होता की, “एपस्टाईन फाइल्स” मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आहे. म्हणूनच सरकारने दोषी ठरवलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक केली नाहीत. यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांच्यावर “वेडेपणा” केल्याचा आरोप करत त्यांच्या या वर्तनाचे कारण ड्रग्जच्या वापर असल्याचे म्हटले.