पीटीआय, अहमदाबाद
सरकारी धोरणांची समीक्षा करण्यात आघाडीवर असलेल्या ‘गुजरात समाचार’ या वृत्तपत्राच्या मालकांपैकी एक असलेल्या बाहुबली शहा यांच्या कार्यालयावर छापा टाकून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी त्यांना अटक केली. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही अटक करण्यात आली असून वैद्याकीय कारणास्तव त्यांना ३१ मेपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला.
‘लोक प्रकाशन लिमिटेड’कडून गुजरात समाचार हे वृत्तपत्र चालविले जाते. बाहुबली शहा या कंपनीचे संचालक आहेत. त्यांचे ज्येष्ठ बंधू श्रेयांश शहा हे वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक आहेत. करचुकवेगिरीप्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून गेली दोन दिवस बाहुबली यांची चौकशी केल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक वॉरंट घेऊन त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला. २०२३ पासून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून त्यांची चौकशी सुरू असून या प्रकरणातच त्यांना अटक करण्यात आली. आर्थिक गैरव्यवहाप्रकरणी ईडी आणि प्राप्तिकर विभाग एकाच वेळी चौकशी करत आहेत. अटक झाल्यानंतर शाह यांची प्रकृती बिघडल्यानंतर ईडीकडून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ३१ मेपर्यंत जामीर मंजूर करण्यात आला.
काँग्रेसकडून टीका
‘गुजरात समाचार’च्या मालकाविरोधात ईडीने केलेल्या कारवाईवर काँग्रेसने शुक्रवारी टीका केली. सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या किंवा भाजपशी तडजोड न करणाऱ्या कोणालाही तुरुंगात जावे लागेल, असा दावा काँग्रेसने केला. निष्पक्षपाती माध्यमांवर सरकार दबाव आणत असून ते लोकशाहीसाठी घातक आहे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सरकारवर टीका केली.
‘गुजरात समाचार’ला गप्प करण्याचा प्रयत्न म्हणजे केवळ एका वृत्तपत्राचाच नव्हे तर संपूर्ण लोकशाहीचा आवाज दाबण्याचे आणखी एक षड्यंत्र आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
सरकारी धोरणांची समीक्षा करण्यात आघाडीवर
गुजरात समाचार हे गुजरातमधील सर्वाधिक जुने वृत्तपत्र असून ते गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वितरित केले जाते. त्यांच्या संकेतस्थाने २०१४च्या भारतीय वाचक सर्वेक्षणाचा हवाला देऊन त्यांची सरासरी दैनिक वाचकसंख्या ४६ लाख असल्याचे म्हटले आहे. या वृत्तपत्राचे मुख्य कार्यालय अहमदाबाद येथे आहे. सरकारी धोरणांची समीक्षा करण्यासाठी हे वृत्तपत्र ओळखले जाते.